गेलविरुद्ध उपोषणाला शेकापचा पाठिंबा
| पेण | प्रतिनिधी |
गेलविरुद्ध उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा असून, शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार असून, गेलचा आराखडा बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन शेकापचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनी दिले. कंपनीविरोधात 24 गाव सेझ संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी आक्रमक झाले असून, प्रांत कार्यालयाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अतुल म्हात्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
अतुल म्हात्रे यांनी सांगितले की, गेल कंपनीचा आराखडा बदलणे गरजेचे आहे. कारण, आताच्या आराखड्यात शेकडो शेतकरी बाधित होत आहेत. जर पाईपलाईनचा मार्ग बदलला, तर शेतकर्यांचे नुकसान होणार नाही. पूर्ण पाईपलाईन समुद्राच्या किनार्याने नेल्याने गेल कंपनीचा हेतू साध्य होईल. तसेच शेतकर्यांची जमीनसुद्धा वाचेल. म्हणून मी सर्वतोपरी आराखडा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्याबाबत गेल कंपनी प्रशासनाशी वाटाघाटीही सुरू केल्या आहेत.
तालुक्यातील रावे, कोपर, डावरे, हनुमान पाडा, जोहे, कळवे, कणे, बोर्झे, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिर्की, बोर्वे, मसद आदी गावांतील शेतकर्यांच्या सुपीक जमिनी गेल कंपनी गॅस पाईपलाईनसाठी भूसंपादन करत असल्याने येथील हजारो शेतकरी उद्ध्स्त होणार आहेत. त्यामुळे सदर कंपनीविरोधात 24 गाव सेझ संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी प्रांत कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनाला इशारा दिला आहे. शासन व गेल कंपनी प्रशासनाने शेतकर्यांचे म्हणणे ऐकून जर पाईपलाईनचा मार्ग बदलला नाही, तर गणेशोत्सवानंतर शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.
उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल कंपनीने गॅस पाईपलाईनसाठी येथील जमिनी भूसंपादन करण्याचा घाट घातला आहे. यामुळे येथील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. याला वारंवार शेतकर्यांनी विरोध केला असून, अनेकदा आंदोलनेही केली आहेत. त्यातच 12 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही बाजूनी ठरून भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली असता त्यावेळी कंपनीने कबूल केले होते. मात्र, आता याकडे शासन व कंपनी प्रशासन कानाडोळा करत असल्याने अखेर शेतकर्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनाला दिलीप पाटील, काशिनाथ पाटील, आर.के. पाटील, संजय थळे, लवेंद्र मोकल, विनोद म्हात्रे, राष्ट्रीय कबड्डीपटू मारूती म्हात्रे आदी उपस्थित होते.