माथेरानला नवीन झळाळी देणार : शिवाजी शिंदे

| माथेरान | प्रतिनिधी |

ज्या स्थळांवरील रस्ते सुस्थितीत असतात त्या स्थळांचा सर्वांगीण विकास होतो ही खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माथेरानच्या मुख्य महात्मा गांधी मार्गावरील बहुतांश भागात विद्रुपीकरण झाल्याने पर्यटकांना मोकळा श्वास घेता यावा. याच उद्देशाने माथेरानच्या मुख्य रस्त्याला मॉल रोडच्या धर्तीवर नवीन झळाळी प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी सांगितले. पुढे बोलताना, या मार्गावर असणाऱ्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन नियमितपणे केले जाणार आहे. रस्त्याच्या बाजूला नगरपरिषदेच्या जागेवर काही ठिकाणी पत्र्याचे कंपाउंड टाकून जागा व्यापल्या आहेत. अशाप्रकारची अतिक्रमणे ताबडतोब काढून त्या जागी पर्यटकांना बसण्यासाठी आकर्षक बाके लावण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे क्षणभर विश्रांती घेण्यासाठी पर्यटकांना फायदेशीर ठरू शकते. पर्यावरण, पर्यटन व नियोजन या समितीचे सभापती पद असल्याने या पदाला न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. स्वच्छतेच्या दृष्टीने प्लास्टिक मुक्त माथेरान करण्यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत पावसाळी हलक्या दर्जाचे प्लास्टिक रेनकोटवर कायमची बंदीचा ठराव करण्यात आला आहे. तसेच, पर्यटन वाढीसाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना अत्यावश्यक सेवासुविधा पुरविणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे, असेही शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version