अंजुमन उर्दू स्कूलला मदत करणार; चित्रलेखा पाटील यांची ग्वाही

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मुरुड येथील अंजुमन इस्लाम जंजिरा उर्दू प्रायमरी स्कूलचे नाव आणि प्रगतीचा आलेख दिवसेन दिवस वाढताना दिसत आहे. या शाळेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पीएनपी शिक्षण संस्थेच्या कार्यवाहक चित्रलेखा पाटील यांनी केले.

अंजुमन इस्लाम जंजिरा उर्दू प्रायमरी स्कूल मुरुड बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अंजुमन इस्लाम जंजिरा उर्दू प्रायमरी स्कूल चेअरमन अहेमद हसन इर्फ़नशा, डॉ. निसार अहमद बिरवाडकर, प्रवीण मालादनंकर, हाफिजू कबळे, रहीम कबळे, अल्ताफ मलिक, समीर दावनाक, झाहीद गोठेकर, अझीम खानजादा, हिफझुरेहेमान नजीर, अदनान कडू, मुसवीर जमादार, डॉ. अमरीन कडू, राहील कडू, ढहाकाम, चंद्रकांत कमाने, तुकाराम पाटील, रमेश दिवेकर, विकास दिवेकर, अँड. मोहिनेश ठाकूर, बाबुलाल पाखरे, मुझफर दांडेकर, पालक व विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षणाचे महत्व माणसाच्या जीवनात खूप मोठे आहे. थोर महात्म्यांनी शिक्षणाचे महत्व लोकांना, समाजाला पटवून देत देत आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. शिक्षण मनुष्याच्या बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचे काम करते, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. सोबतच सर्व धर्मियांनी आपापली भाषा टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. सध्याचे राजकीय वातावरण गढूळ झालेले आहे, आताचे सरकार आणि त्यांची मानसिकता चुकीची आहे. चुकीचे चित्र निर्माण करून दडपशाही धोरण वापरले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

राजकारण एका विचार धारेवर असले पाहिजे. यामध्ये जातिवाद, धर्मवाद नसला पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षण आणि आरोग्यासाठी शेकाप कधीही राजकारण करत नाही. मुरुडकरांच्या आरोग्यासाठी, आपल्या बांधवांसाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये माझ्या माध्यमातून जवळपास सत्तर लाखांचे डायलेसिस मशीन दिलेल्या आहेत आणि यापुढे शेकाप मार्फत आम्ही अंजुमन इस्लाम जंजिरा उर्दू प्रायमरी स्कूलला सर्वोतोपरी मदत करणार आहोत.

चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख
Exit mobile version