मुरुड पूरग्रस्तांना मदत मिळवून देणार ; आ.अनिकेत तटकरेंचे आश्‍वासन

मुरूड | वार्ताहर |
बारा जुलैला मुरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांना शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करु असे अश्‍वासन आ.अनिकेत तटकरे यांनी खारिकवाडा ग्रामस्थांशी बोलतांना दिले.

आ. तटकरे यांनी मुरुड तालुक्यातील आदाड, खारीकवाडा,उसरोली,खारदोडकुले पुरग्रस्त भागासह नांदगाव हायस्कूल व काशिनाथ पां.कुलकर्णी दवाखान्याला भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.तसेच ग्रामस्थांची आस्थेने चौकशी केली. त्यावेळी त्यांनी ज्यांचे जेवढे नुकसान झाले आहे त्यांचे झालेले पंचनामे व अहवाल घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री सर्वपक्षीय खासदार,आमदारांच्या बैठकीत ठेऊन शासकीय निकषानुसार जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळवून देण्या करीता प्रयत्न करु; तोक्ते वादळाचीही अद्याप सर्वांनाच भरपाई मिळालेली नाही.प्रयत्न नक्कीच करू परंतु कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही आधीच ताण असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नांदगाव दवाखान्याला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळावा यासाठी व नांदगाव हायस्कूलला अन्य मार्गाने मदत मिळवून देण्याचेही प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले.यावेळी मंगेश दांडेकर, स्मीता खेडेकर फैरोजशेठ घलटे, आशिका ठाकूर, विजय पैर,मनिष माळी, अ‍ॅड.मृणाल खोत,योगेंद्र गोयजी,इम्तियाज मलबारी,मुख्याध्यापक गिरीश जोशी आदी उपस्थित होते.

Exit mobile version