आरबीआयचे पतधोरण 7 एप्रिलला
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक एप्रिल महिन्यातील पहिल्या पंधरावड्यात होणार आहे. आता पुन्हा एकदा आरबीआय रेपो रेट कमी करत गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेणार्यांना दिलासा देणार का, याकडे लक्ष लागलं आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक 7 एप्रिलला सुरु होणार आहे. या समितीच्या बैठकीतील निर्णय 9 एप्रिलला जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा काय निर्णय घेतात, याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
संजय म्हलोत्रा यांनी पहिल्यांदा पतधोरण जाहीर केलं, तेव्हा 25 बेसिस पॉईंटची कपात केली होती. किरकोळ महागाईमध्येदेखील घट झाल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय विकासाचा दर मात्र अद्याप अपेक्षेप्रमाणं वाढलेला नाही. त्यामुळं आरबीआयकडे व्याज दर कपात करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग अद्याप अपेक्षेइतका वाढलेला नाही. आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसर्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ दुसर्या तिमाहीच्या तुलनेत वाढली आहे. हा दर 6.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या चांगल्या वाढीच्या शक्यतेच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, परस्परशुल्क, विविध देशांमधील तणाव या मुद्द्यांचा परिणामदेखील अर्थव्यवस्थेवर झाला आहे.