। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ या दोन नव्या उपक्रमांचा शुभारंभ केला. 2014 मध्ये देशवासियांनी भारताला उघड्यावर शौचमुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. 10 कोटींहून अधिक शौचालये बांधून देशवासियांनी ही प्रतिज्ञा पूर्ण केली. आता ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’चे ध्येय हे कचरामुक्त शहर, म्हणजे कचर्यापासून शहर पूर्णपणे मुक्त करणे असल्याचे या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले.
‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ या दोन नव्या उपक्रमांमुळे देशातील वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणार्या समस्यांचा सामना करणे शक्य होईल. यामुळे शहरे हे अधिक उत्तम होतील. आगामी काळात कचर्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवरून 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. पाण्याच्या साठ्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘अमृत 2.0’ योजनेसाठी 2.87 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढवणे आणि आपल्या शहराला जल संरक्षित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांमसोर ठेवण्यात आले आहे. देशातील 10.5 कोटी जनतेला याचा लाभ मिळेल.
मिशन अमृतच्या पुढील टप्प्यात सांडपाणी आणि मलनिस्सारण व्यवस्थापन वाढवणे, आपल्या शहरांना पाणी सुरक्षित शहर बनवणे आणि आपल्या नद्यांमध्ये कुठेही नाल्यांचे प्रदुषित पाणी जाणार नाहीत याची खात्री करणे, हे देशाचे ध्येय आहे. स्वच्छ भारत अभियान आणि अमृत मिशनचा आतापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रत्येक नागरिकाचा अभिमानाने भरून टाकणारा आहे. हे एक मिशन आहे, यात मान, प्रतिष्ठा, देशाची महत्वाकांक्षा आणि मातृभूमीसाठीचे प्रेमही आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
डॉ. आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करणार
स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढचा टप्पा देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. असमानता दूर करण्याचे उत्तम माध्यम म्हणून शहरी विकासावर बाबासाहेबांचा विश्वास होता. एकतर घरापासून दूर आणि वरून अशा परिस्थितीत राहणे, हा एक दुहेरी फटका होता. ही परिस्थिती बदलण्यावर आणि समाजातील विषमता दूर करण्यावर बाबासाहेबांनी भर दिला होता. स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढील टप्पा देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
रोज 70 टक्के कचर्याची विल्हेवाट
आज भारत दररोज सुमारे 1 लाख टन कचर्यावर प्रक्रिया करत आहे. 2014 मध्ये जेव्हा आम्ही मोहीम सुरू केली तेव्हा 20 टक्क्यांपेक्षा कमी कचर्यावर प्रक्रिया केली जात होती. आज आपण दररोज सुमारे 70 टक्के कचर्यावर प्रक्रिया करत आहोत. स्वच्छता ही एक दिवस, पंधरवडा, वर्ष किंवा काही लोकांचे काम आहे, असे नाही. स्वच्छता ही प्रत्येकासाठी एक मोठी मोहीम आहे, प्रत्येक दिवस, प्रत्येक पंधरवडा, दरवर्षी, पिढ्यानपिढ्या चालणारे अभियान आहे. स्वच्छता जीवनशैली आहे, स्वच्छता हा जीवनमंत्र आहे. ते 100 टक्क्यांपर्यंत नेले पाहिजे, असे पंतप्रधांनी स्पष्ट केले.