मेस्सी वर्तुळ पुर्ण करणार?

| न्युयॉर्क | वृत्तसंस्था |

गतवर्षी कोपा अमेरिका करंडक जिंकून लिओनेल मेस्सीने आपल्या मुकुटात आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा पहिला तुरा खोवला होता. त्यानंतर विश्वविजेतेपदाचा करंडकही उंचावला आणि यावेळीही कोपा अमेरिका करंडक जिंकून तो वर्तुळ पूर्ण करणार का, याची उत्सुकता फुटबॉल विश्वाला लागून राहिली आहे. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी 5.30 वाजता ही अंतिम लढत सुरू होणार आहे.

अर्जेंटिनाने थाटात विश्वविजेतेपदाहि अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य सामन्यात त्यांनी कॅनडाचे आव्हान मोडून काढले होते. यात मेस्सीचा गोल निर्णायक ठरला. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या कोलंबियाने उरुग्वेवर मात केली. या सामन्यातून कोलंबियाचा स्टार खेळाडू जेम्स रॉड्रिगेझने आपले नाव इतिहासात लिहिले. कोपा अमेरिका स्पर्धेत गोलांसाठी सहाय्य करण्याचा विक्रम त्याने मेस्सीला मागे टाकून मोडला. या स्पर्धेत त्याने सहा गोलांना सहाय्य केले. 2021च्या स्पर्धेत मेस्सीने पाच गोलांना सहाय्य करण्याचा विक्रम केला होता.

अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचे पारडे जड असले तरी कोलंबियाचा संघ धसमुसळ्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यांचे प्रशिक्षक नेस्टॉर लॉरेन्झो यांनी उपांत्य फेरीच्या त्या सामन्यात राखीव खेळाडू खेळवण्याची संख्या मर्यादित ठेवली होती. रॉड्रिगेझला तर त्यांनी 62व्या मिनिटाला मैदानात आणले होते. अर्जेंटिनाचा संघ हा पारंपरिक खेळ करणारा संघ आहे. अंतिम सामन्यात कोलंबियाचे खेळाडू निश्चितच मेस्सीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे इतर खेळाडूंसाठी गोल करण्याचा मार्गही तयार होऊ शकतो.

Exit mobile version