मिलिंद देवरा राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार?

प्रफुल्ल पटेलांची भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

| मुंबई | वृत्तसंस्था |

काँग्रेसचे बडे नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय माजी खासदार मिलिंद देवरा हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची यासंबंधित दोन वेळा भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईतून खासदारकी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते माजी खासदारही आहेत. मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते सध्या नाराज असल्याने राजकारणापासून दूर असल्याची चर्चा आहे. पुढच्या वर्षी सुरूवातीला लोकसभेची निवडणूक होणार असून त्या दृष्टीने त्यांनी पुन्हा एकदा चाचपणी सुरू केली आहे. राज्यात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढणार आहेत. आमदार किंवा खासदार ज्या पक्षाच्या त्या ठिकाणचा उमेदवार त्या पक्षाचा हा सरळ फॉर्म्युला महाविकास आघाडी राबवणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा ही काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना न मिळता ती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे आपल्या राजकीय भवितव्याची चाचपणी करण्यासाठी मिलिंद देवरा यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

दक्षिण मुंबईमध्ये गुजराती समूदायाची आणि उद्योगविश्वाशी निगडीत लोकांची संख्या जास्त असल्याने या जागेवर आधीच भाजपने दावा सांगितला आहे. अजित पवार गटाने या जागेची मागणी जरी केली असली तरी भाजप त्याला कितपत साथ देणार हे पहावे लागेल.

Exit mobile version