शासकीय सुट्टीमुळे इच्छुकांचा हिरमोड
| रायगड | प्रतिनिधी |
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला अनेक जोडपी आयुष्यभराच्या नात्याची अधिकृत नोंद करण्याचे स्वप्न पाहतात. हातात हात घेऊन प्रेमाची शपथ नोंदणी विवाहातून अधिकृत करण्याची इच्छा असते. मात्र, यंदा 14 फेब्रुवारी हा शासकीय सुट्टीचा दिवस (शनिवार) आल्याने रायगडमधील अनेक इच्छुक जोडप्यांचा हा खास मुहूर्त हुकणार आहे.
दरवर्षी 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन सप्ताहा’त नोंदणी विवाहांची संख्या वाढलेली दिसते. प्रेमाचा हा आठवडा आणि त्यातील प्रत्येक दिवस साजरा करण्याबरोबरच अनेक तरुण-तरुणी या काळात विवाह नोंदणी करण्यास प्राधान्य देतात. विशेषतः 14 फेब्रुवारीला विवाहबद्ध होण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत वाढला आहे. मात्र, यंदा 7, 8 आणि 14 फेब्रुवारी हे सुटीचे दिवस आल्याने नोंदणी विवाहासाठी ऑनलाइन स्लॉट मिळूनही त्या दिवशी प्रत्यक्ष विवाह नोंदणी होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक जोडप्यांचा हिरमोड झाला आहे. प्रेमाचा दिवस आयुष्यभरासाठी संस्मरणीय करण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी यंदाचा ‘व्हॅलेंटाइन डे’ नोंदणी विवाहासाठी उपलब्ध नसला, तरी पर्यायी तारखांवर विवाह नोंदवून प्रेमाच्या नात्याला कायदेशीर मान्यता देण्याचा मार्ग खुला आहे.
अवघ्या 250 रुपयांत विवाह नोंदणी
नोंदणी विवाहासाठी सध्या ऑनलाइन पूर्वनोंदणी बंधनकारक असून, विवाह अधिकाऱ्यांकडून एका दिवशी जास्तीत जास्त पाचच विवाह नोंदवले जातात. नोंदणी विवाहाची पद्धत अत्यंत सोपी, पारदर्शक आणि अल्पखर्चिक आहे. केवळ 250 रुपयांत हा विवाह कायदेशीररित्या नोंदवता येतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उपलब्ध स्लॉटनुसार इच्छुकांना कार्यालयीन वेळेत स्वतःच्या सोयीनुसार वेळ निवडता येते. 14 फेब्रुवारी सुट्टीचा दिवस असल्याने इच्छुकांकडून 13 किंवा 15 फेब्रुवारीचा पर्याय निवडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नोंदणी विवाहासाठी हे आवश्यक
नोंदणी विवाहासाठी काही आवश्यक अटीही आहेत. वराचे वय 21 वर्षांपेक्षा अधिक व वधूचे 18 वर्षांपेक्षा अधिक असल्याचा पुरावा आवश्यक आहे. त्यापैकी किमान एकाचा रहिवास संबंधित विवाह अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात असणे गरजेचे आहे. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्र आवश्यक असते. वधू किंवा वर घटस्फोटीत असल्यास न्यायालयाचा आदेश, तसेच विधवा किंवा विधूर असल्यास जोडीदाराच्या मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. याशिवाय ओळखीचे तीन साक्षीदार त्यांच्या ओळखपत्रांसह उपस्थित असणे बंधनकारक आहे.







