राहुल गांधींना सरकारने दिली वॉर्निंग
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
चीनमध्ये कोरोनाचा नव्याने झालेला उद्रेक पाहता भारताने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर ही यात्रा स्थगित करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना दिल्या आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी सध्या राजस्थानात आहेत. मांडविया यांनी काल देशातील सर्वच राज्यांना कोरोना नियम पालनासंदर्भात पत्र लिहिले. त्यात राहुल गांधी तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही पत्र लिहिले.
कोविड नियमांचे पालन करणे शक्य नसेल तर ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ची परिस्थिती लक्षात घेऊन यात्रा थांबवावी, असे आरोग्यमंत्र्यांच्या पत्रात म्हटले आहे. या पत्रात आरोग्य मंत्रालयाने यात्रेत मास्क आणि सॅन्टिझरच्या वापरावर भर दिला असून लसीकरण झालेल्या लोकांनीच सहभागी व्हावे, असे सांगितले आहे.
भारत जोडो यात्रेत सहभागी सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळत आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खूदेखील यात्रेतून परतल्यावर कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा पत्रात लिहिले आहे.
मोदी गुजरातेत मास्क लावून गेले होते का?
दरम्यान, सरकारचा हा नाहक कांगावा असल्याची टीका काँग्रेसकडून होतेय. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे मोदी सरकार घाबरले आहे. सामान्य नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करत आहे. गुजरात निवडणुकांमध्ये मोदी घरोघरी मास्क लावून गेले होते का? असा सवाल काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केलाय.
संजय राऊतांचीही टीका
तर, केंद्र सरकार नव-नवी कारणं शोधून भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केला आहे.