रोहितची मस्करी ठरणार खरी?

। मुंबई । प्रतिनिधी ।

शाबास डीके, वर्ल्ड कप खेळायचा आहे… दिनेश कार्तिक मुंबईविरुद्ध खेळत असताना रोहित शर्माने गंमतीत हे वक्तव्य केले होते. आता दिनेश कार्तिकने ते गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. निदान आयपीएल 2024 मधील त्याची कामगिरी पाहून तरी असे म्हणता येईल.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकने 35 चेंडूत 83 धावांची स्फोटक खेळी केली. आणि जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत आशेचा किरण होता. पण तो आऊट झाल्यानंतर मावळला. जरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना हरला असला तरी कार्तिकने जे काही केले त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

2022 मध्ये जेव्हा टी-20 वर्ल्ड कप झाला, त्याआधीही आयपीएलमध्ये कार्तिकने अप्रतिम फलंदाजी केली. जवळपास संपुष्टात आलेल्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला त्या आयपीएलमध्ये नवसंजीवनी मिळाली. आता त्या वर्षातील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर दिनेशने 16 सामन्यात 330 धावा केल्या होत्या. त्याची सरासरी 55 होती, तर त्याने 183.33 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. त्यावर्षी आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता आणि त्यात कार्तिकचे मोठे योगदान होते. कार्तिकने जवळपास गमावलेल्या काही सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्याचे काम केले होते.

आतापर्यंत फक्त सात सामने झाले आहेत. आरसीबी संघ जरी प्लेऑफमध्ये पोहोचला नसला तरी त्यांचे 7 सामने बाकी आहेत. त्याच वेळी, 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी, तो आणखी तीन ते चार सामने खेळला असता. अशा स्थितीत त्याची कामगिरी लक्षात घेऊन बीसीसीआयची निवड समिती त्याला टी-20 वर्ल्ड कप पाठवण्याचा विचार करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Exit mobile version