शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळवून देणार: खा. बारणे

| नेरळ | प्रतिनिधी |

बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका उभारण्याच्या प्रकल्पासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. या अधिग्रहण प्रक्रियेत बाधित शेतकऱ्यांना चालू बाजारभावापेक्षा जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीरंग बारणे यांनी दिले.

कर्जत-नेरळ परिसरातील शेतकऱ्यांनी खा. बारणे यांना निवेदन देत जमीन अधिग्रहणाबाबतचा प्रश्न मांडला आहे. लवकरच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक या भागाचा पाहणी दौरा करणार असून, त्यावेळी हा मुद्दा पुढे मांडला जाईल, असेही बारणे यांनी सांगितले. बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावर दोन नवीन रेल्वे मार्गिका टाकण्याबरोबरच फाटक असलेल्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जास्त मोबदला देण्यात यावा तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे सेवेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कर्जत ते शेलूदरम्यान असलेले रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याच्या निर्णयाचे स्थानिकांकडून स्वागत होत आहे. मात्र, या प्रकल्पासाठी संपादित होणारी जमीन बागायती व सुपीक असल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. जमीन संपादित झाल्यानंतर शेतकरी भूमीहीन होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात महेश भगत आणि शिवाजी कराळे यांनी शेतकऱ्यांना पाचपट मोबदला देण्याची मागणी केली आहे. आंबिवली गावातील शेतकऱ्यांनी पुणे येथील कार्यालयात जाऊन खासदार बारणे यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून रेल्वे मंत्री व रेल्वे बोर्डाकडे ही मागणी मांडली जाईल, असे आश्वासन बारणे यांनी दिले. लवकरच मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना नेरळ व कर्जत परिसरातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार असून, ग्रामीण भागातील बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही खासदार बारणे यांनी स्पष्ट केले.

कर्जत परिसरातील रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल उभारण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, विकासकामे करताना ज्यांच्या सुपीक जमिनी किंवा घरे जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांच्या भविष्याचीही सरकारने काळजी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

महेश भगत,
शेतकरी
Exit mobile version