| मुंबई | प्रतिनिधी |
सध्या राजकारणात अनेक उलथापालथ होत आहे. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची बातमी समोर आली. पण याबाबत शरद पवार गटाच्या बड्या नेत्यानं स्पष्टपणे भूमिका मांडली. चुकीची बातमी पेरली गेल्याचं शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही. आमचा पक्ष शरद पवार आहे. आमचं चिन्ह शरद पवार आहे. त्यांच्याच नावावर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. त्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत, असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?
शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार, अशी बातमी काहीवेळा आधी आली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मंगलदास बांदल यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार गट काँग्रेसमध्ये सामील होण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असं म्हटलं. मात्र ही अफवा असल्याचं शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.