एमआयडीसीविरोधात वर्षभर वडखळ नाक्यावर बसणार

शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा इशारा

। अलिबाग । भारत रांजणकर ।
रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी एमआयडीसीने भूमी संपादन केले आहे मात्र या जमिनींवर अद्याप कोणतेही उद्योग उभे राहिले नाहीत. पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या भूसंपादनात एमआयडीसी विस्तार करू पाहात आहे. या भूसंपादनामुळे येथील अकरा गावांतील वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. त्याबाबत राज्य शासन, कंपनी किंवा एमआायडीसी उत्तर देण्यास तयार नाही. जोपर्यंत या समस्येची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत येथील शेतकरी एमआयडीसीसाठी एक इंचही जागा देणार नाही अलिबाग आणि पेण तालुक्यातील संपूर्ण खारेपाट आपण वर्षभरासाठी वडखळच्या नाक्यावर बसवू पण एकही इंचही जागा आम्ही देणार नाही असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी येथे दिला.
रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी चाललेल्या सक्तीच्या जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी शेतक-यांनी गुरुवारी येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पेण तालुक्यातील जेएसडब्लू व अलिबाग-विरार मल्टीमोटल कॉरिडॉर तसेच रोहा-मुरूड तालुक्यात बल्क ड्रग्ज फार्मापार्कसाठी शेतक-यांच्या जमिनी सक्तीने संपादित केल्या जात आहेत. त्याला विरोध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चामध्ये शेकाप नेते आ. जयंत पाटील, भाजपचे पेणचे आ. रवींद्र पाटील, पेणचे माजी आमदार धैर्यशिल पाटील, सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, साकवचे अरुण शिवकर, समाजसेविका वैशाली पाटील, काँग्रेस प्रदेश सचिव नंदा म्हात्रे, रामनाथ घाग, उमेश ठाकूर, के. जी. म्हात्रे, लक्ष्मण कोटेकर, विजय पाटील, सदानंद ठाकूर, आदी सहभागी झाले होते. चेंढरे येथून दुपारी बारा वाजताच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. एम.आय.डी.सी. हटाव जमिन बचाव, आगरी-कोळ्यांचा एकच दणका आघाडी सरकारचा मोडू मणका… या घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले. कोएसो माध्यमिक शाळा येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू प्रकल्पाला तीस-चाळीस वर्षांपूर्वी हा प्रकल्प झाला. त्यानंतर एमआयडीसीचा दोन वेळा विस्तार झाला. शेवटच्या वेळी जेव्हा विस्तार झाला तेव्हा तत्कालीन पेणचे आमदार मोहन पाटील व आपण तत्कालीन उद्योग मंत्री पतंगराव कदम यांची भेट घेतली. तेव्हा या प्रकल्पासाठी पुन्हा एमआयडीसीचा विस्तार होणार नाही असे लेखी आश्‍वासन त्यावेळी राज्य शासनाने दिले होते दिलेले आहे, हा मात्र हा प्रकल्प सातत्याने वाढत आहे. हा प्रकल्प वाढत असताना तेथील 11 गावांतील समस्या वाढत आहेत. मात्र शेतकर्‍यांच्या समस्यांना सोडविल्या जात नाहीत. याविरोधात शेतकरी स्वतःच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू लागलेत. राज्यकर्ते याकडे बघायला तयार नाहीत. राज्य शासन एमआयडीसीचा विस्तार का करीत आहे कळत नाही. जिल्ह्यात एमआयडीसीने भूसंपादन केले आहे, त्याचा विकास केलेला नाही. तेथे प्रकल्प आले नाहीत. नवीन क्षेत्र घेऊन ते ओसाड ठेवलेच जाते ही भूमिका बरोबर नाही. त्यातील काही आर झोन करण्याचा प्रयत्न केला जातो हे बरोबर नाही. विकासाला आमचा विरोध नाही पण त्या विकासाचा प्लान आम्हाला द्यावा. नियोजन करावे. त्या प्रमाणे वसाहतींचा विकास होईल. येथील स्थानिक युवक आता उच्च शिक्षित झाले आहेत. येथील स्थानिक युवक त्याची उभारणी करू शकेल. त्यासाठी एमआयडीसीची गरज नाही. त्यामुळे येथील युवकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्‍वास शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी यावेळी पत्रकारांबरोबर संवाद साधताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, 11 गावांमध्ये वेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. त्याबाबत राज्य सरकार, कंपनी किंवा एमआयडीसीकडून जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत अकरा गावचे शेतकरी एक इंचही जागा देणार नाही. येथील शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत आपण विधीमंडळात अनेक वेळा आवाज उठवला आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
जेएसडब्ल्यूचा अधिकारी येवो अगर शासकीय अधिकारी येवो शेतकर्‍यांनी त्यांचा ठाम विरोध करायची तयारी ठेवावी. पेन्शान आणि कोयता सोबत ठेवून आपल्याला आक्रमक व्हावे लागेल. या आंदोलनासाठी राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून काम करावे लागेल. ज्याचा राजा व्यापारी तिथली प्रजा भिकारी. राज्यकर्ते जर जमिनींची दलालीसाठी फिरायला लागले तर मिळेल ते हातात घेऊन जो कोणी गावात येईल त्याला बाहेर काढा. सर्वांना विकत घेता येईल पण खारेपाटातील आमचा शेतकरी एकदा का रस्त्याव उतरला तर रिलायन्स सारख्या भांडवलदाराला हाकलण्याचे काम इथल्याच शेतकर्‍यांनी केलेले आहे. तेच काम आता परत करण्याची वेळ आलेली आहे. इथली जमीन आमची आहे तिचा विकास करुन परिसराचा विकास आम्हीच करु असेही जयंत पाटील यांनी यावेळी ठणकावले. शेतकरी नेते राकेश टिकेत देखील या आंदोलनासाठी रायगडमध्ये येतील असा शब्द त्यांनी दिला आहे. पुढच्या आंदोलनात वडखळ नाक्यावर टिकेत सहभागी होतील. अलिबाग आणि पेण तालुक्यातील संपूर्ण खारेपाट आपण वर्षभरासाठी वडखळच्या नाक्यावर बसवू पण एकही इंचही जागा आम्ही देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारने जेएसडब्ल्यूचा दलाल म्हणून दाराशी येऊ नये -धैर्यशिल पाटील
पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, विकासाच्या नावाखाली शेतीच्या माध्यमातून येथील जमिनींचे भूसंपादन केले जात आहे. भूसंपादन करायचे आणि त्याची विक्री करायची हा आता धंदा झाला आहे. शेतकर्‍यांचा त्यास विरोध आहे. आमचा विकासाला विरोध नाही मात्र या विकासात येथील भूमिपुत्रांचा चेहरा दिसला पाहिजे. शेतकर्‍यांनीही आपल्या भूमिकेवर ठाम राहून हा लढा सुरूच ठेवावा. जोपर्यंत आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत तोपर्यंत कोणीही आपल्या जमिनी विकू शकत नाही, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मायबाप शासनाने मायबाप होऊन शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकावे. हे म्हणणे ऐकताना मायेच्या आणि बापाच्या नात्याने ऐकावे. पण जर मायेच्या आणि बापाच्या नात्याने ऐकणार नसलास तरी चालेल आम्ही आमचा संसार चालवू. शेतीभाती पिकवून खावू. पण जेएसडब्ल्यूचा दलाल म्हणून आमच्या दाराशी येऊ नको असा इशारा आ. धैर्यशिल पाटील यांनी शेतकर्‍यांच्या वतीने ठणकावून दिला. जो पर्यंत आमची जमीन आमच्या हातात सरकार देत नाही तिथपर्यंत आमचे लढणे थांबणार नाही, या इर्शेने लढण्याचे आवाहन धैर्यशिल पाटील यांनी केले.

रायगड जिल्हा वाचविण्याची जबाबदारी शेतकर्‍यांच्या खांद्यावर-उल्का महाजन
सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन आदी नेत्यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना आतापर्यंत इतक्या रासायनिक प्रकल्पांनी रायगड जिल्ह्याला नासवले आहे. सर्व नद्या प्रदुषीत केल्या आहेत. आता फक्त सरकारवर भरवसा ठेवून चालणार नाही. लोकांना जागे रहावे लागेल की आपल्या जमिनी आपण वाचवल्या पाहिजे, टिकवल्या पाहिजे. आपल्या नद्या, खाडया आपण वाचवल्या पाहिजेत. आणि ते करायच्या आड जे कोणी येतील त्यांच्याशी लढायची तयारी आपल्याला ठेवायलाच लागेल. एका मोर्चाने हे होणार नाही. असे मोर्चे, आंदोलन आपल्याला वारंवार करावे लागतील कारण खूप मोठा पैसा यात गुंतलेला आहे. त्यामुळे पैसा मोठा कि जनतेचा अधिकार मोठा हे ठरविण्याची वेळ आहे. आपण या ठिकाणी दाखवून देणार आहोत की लोकशाहीच या देशात मोठी आहे. लोकांचा अधिकार मोठा आहे. लोक जे सांगतील ते सरकारला ऐकावेच लागेल. आणि ते जोपर्यंत ऐकत नाही तो पर्यंत आपण हिमत सोडून चालणार नाही. हा रायगड जिल्हा वाचविण्याची जबाबदारी शेतकरी म्हणून आपल्या खांद्यावर आहे. देशभरात शेतकरी आंदोलन जिंकलेले आहे. पंतप्रधानांना पण शेतकर्‍यांनी नमविले आहे. इथून पुढे हा देश वाचविणार ते शेतकरी आणि शेतकरीच. हा जिल्हा वाचवायला आम्ही समर्थ आहोत हा निर्धार आणि विश्‍वास मनात ठेवण्याचे आवाहन उल्का महाजन यांनी केले.
यावेळी आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी  जिल्हाधिकार्‍यांनी जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्‍वासन दिले. या मोर्चामध्ये अलिबाग, पेण, मुरुड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version