पाणी प्रश्‍नांचे निराकरण करणार – अदिती तटकरे

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील उतेखोलवाडी गावाला भेडसावणारी पाण्याची समस्या जातीने लक्ष देवून सोडविणार असल्याची ग्वाही, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत बोलताना दिली आहे. या बैठकीला तालुक्याच्या तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे, माजी सभापती संगीता बक्कम, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, माजी पाणी पुरवठा सभापती जयंत बोडेरे, किशोरी हिरवे, चेतन गव्हाणकर आदींसह उतेखोलवाडी ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.

माणगावकरांचे ग्रामदैवत असणार्‍या नवरात्रौत्सवनिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे वाकडाई मंदिराच्या देवीचे दर्शन घेऊन उतेखोलवाडी गावात नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते संदीप खरंगटे यांच्या निवासस्थानी आल्या. याठिकाणी पालकमंत्र्यांची ग्रामस्थ व महीलांसमवेत उतेखोलवाडी गावाला भेडसावणार्‍या पाणी समस्येबाबत बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर सध्या कमी दाबाने व अनियमितपणे रात्री 10 वाजता होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत आपल्या तक्रारी व व्यथा मांडल्या.
उतेखोलवाडी गावाला अगोदर व्यवस्थित व नियमित वेळेत पाणी पुरवठा होत असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे यांनी दिली. मात्र नगरपंचायतीवर प्रशासक बसल्यापसून या गावात नेहमीच पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच या समस्येसंदर्भात येथील महिलांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढला होता. परंतु नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
याप्रकरणी, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तालुक्याच्या प्रांताधिकारी तथा नगरपंचायतीच्या प्रशासक प्रशाली जाधव-दिघावकर यांच्यासह संपर्क साधून उतेखोलवाडीतील पाणी पुरवठा नियमित वेळेत सुरू करा असे आदेश दिले आहेत. येत्या चार दिवसांत येथील ग्रामस्थ व महिलांची बैठक घेऊन उतेखोलवाडीच्या पाणी प्रश्‍नांचे निराकरण केले जाईल, असे प्रशासक दिघावकर यांनी पालकमंत्र्यांना सांगितले आहे.

Exit mobile version