उद्या राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
| मुंबई | प्रतिनिधी |
अजित पवार यांच्या निधनाला तीन दिवस उलटले नाहीत तोवर राज्यात उपमुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या नावाची उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू झाली. शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अजितदादांकडे असणारी खाती राष्ट्रवादीला मिळावीत, सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी केल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. उद्या शनिवारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली असून, त्यामध्ये बाकीचे निर्णय होतील, असेही भुजबळ म्हणाले.
शुक्रवारी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, अजितदादा गेले, ते प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिले त्यानंतर झोप उडाली आहे. मात्र, शेवटी शो मस्ट गो ऑन असं आहे. त्यामुळे कुणातरी ही सगळी जबाबदारी पक्ष असेल, सरकार असेल हे पुढे चालवायला हवे. त्यामुळे उद्या शनिवारी विधिमंडळाचे जे सदस्य आहेत, त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधिमंडळ नेतेपद जे अजितदादांकडे होते, त्या पदाबाबत निर्णय होईल, असं त्यांनी सांगितले. तसेच अनेक लोकांच्या सूचना पुढे येत आहेत. त्या रास्त आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावे, अशी अनेकांची मागणी आहे. ते चूक आहे, असं वाटत नाही. ते करायला पाहिजे, पण शेवटी निर्णय हा पक्षाच्या बैठकीत होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माहिती नाही. सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, त्याची कामे पुढे नेण्यावर लक्ष देत आहोत.
उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिक्त आहे. ती ताबोडतोब सुनेत्रा वहिनींच्या द्वारे कशी भरता येईल त्याकडे आमचे सगळ्यांचे लक्ष आहे. बाकीचे पुढे बघता येईल. पक्षात लोक जे ठरवतील, त्याप्रमाणे होईल, असंही छगन भुजबळांनी म्हटलं. दरम्यान, उद्या विधिमंडळ सदस्यांची बैठक आहे. विधिमंडळ पक्ष नेता ठरवण्याचा निर्णय त्यात होईल. कदाचित एकमत झाले आणि निवड झाली तर उद्याच्या उद्या शपथविधीही होऊ शकतो, अशीही माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या रुपाने पहिलीच महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
