अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा?

बांधकामसह महसूल विभागाची हालचाल सुरु

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शासनाचे नियम धाब्यावर बसवून काही धनदांडग्यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून कोळगांव आणि बागदांडा (मिळकतखार) परिसरात बांधकामे केली आहेत. या बांधकामांवर लवकरच हातोडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यामुळे बांधकाम विभागासह महसूल विभागाने हालचाल सुरु केली असून, बांधकाम तोडण्याचा मुहूर्त प्रशासनाकडून कधी लागणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

समुद्रकिनारी अलिशान बंगला असावा, असे अनेकांना वाटत असते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मांडवा परिसरात जागा घेऊन बंगले, फार्महाऊस बांधण्याचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबाग तालुक्यातील मांडवा आणि रेवस परिसरात जागा घेऊन घर आणि बंगला बांधण्यावर अनेक जण भर देत आहेत. या परिसरात बंगला बांधणे ही एक उत्तम गुंतवणूक आणि स्वप्न पुर्ण करणारी कल्पना आहे. तसेच, एक लोकप्रिय वीकेंड स्थळ म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. या परिसरात ठिकठिकाणी भरावातून बांधकाम करून उंच इमारती उभारण्याचा काही धनदांडग्यांकडून प्रयत्न सुरु आहेत.

सिनेकलाकारांसह उद्योजक अशा अनेक मंडळींनी कोळगांव आणि बागदांडा (मिळकतखार) या परिसरात जागा घेऊन बंगले बांधले आहेत. मात्र, हा परिसर समुद्रकिनार पट्टीचा भाग म्हणून ओळखळा जातो. तसेच, हा भाग समुद्राच्या भरती ओहोटीच्या प्रभावाखाली येणारा किनारपट्टीचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी सीआरझेड नियमांचे काटकोर पालन करावे लागते. समुद्रकिनाऱ्यापासून ठराविक अंतराच्या आत बांधकामाला परवानगी दिली जाते. मात्र, काही धनदांडग्यांनी सीआरझेचे उल्लंघन करून बांधकाम केल्याची बाब समोर आली आहे.

अलिबाग तालुक्यातील मिळकतखार (बागदांडा), कोलगाव, नवेदर नवगाव या परिसरात चार ठिकाणी असलेले बांधकाम उल्लंघन करून केले असल्याचा ठपका महसूल विभागाने ठेवला आहे. सीआरेझेडचा भंग करून केलेल्या विकास कामांबाबत महसूल विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सीआरझेडचे उल्लंघन करणाऱ्या चार धनदांडग्यांविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यामध्ये दोन कोळगावमधील असून, इतर दोन नवेदर नवगांव आणि मिळकतखार येथील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता एम.एम. धायतडक यांनी अनधिकृत बांधकाम निष्कसीत करण्यासाठी 53 लाख 80 हजार 842 रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, ते पत्रक मंजुरीसाठी महसूल प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रशासन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी कधी मुहूर्त लावणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांच्या बांधकामांवर महसूल विभागाकडून तातडीने कारवाई केली जाते. मात्र, धनदांडग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई उशीर का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

53.80 लाखाचे अदांजपत्र
सार्वजनिक बांधकाम विभागाने अनधिकृत बांधकाम निष्कसीत करण्यासाठी 53 लाख 80 हजार 842 रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यामध्ये बांधकाम निष्कासित करण्यासाठी कोळगांवमधील 40 लाख 73 हजार 724, कोळगावमधील 5 लाख 11 हजार181, नवेदर नवगांवमधील 9 लाख 93 हजार 751 आणि मिळकतखारमधील 2 हजार 186 रुपयांच्या अंदाज पत्रकांचा समावेश आहे.

सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृत केलेले बांधकाम निष्कासित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून खर्चाचे अंदाजपत्रक मागविण्यात आले. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे.

एम.एम. धायतडक,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
Exit mobile version