हजारो गॅलन तेल वाचवण्याचे प्रयत्न
। खास प्रतिनिधी । रायगड ।
अलिबाग समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीचे जहाज गुरुवारी भरकटले होते. हे जहाज धरमतहून जयगडकडे कोळसा घेऊन निघाले होते. कोस्टगार्डच्या मदतीने 14 खलांशांना शुक्रवारी सकाळी सुखरुप एअर लिफ्ट करण्यात आले. यातील गंभीर बाब म्हणजे, हे जहाज खडकावर आपटून फुटले आहे. त्यामुळे त्या जहाजात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. जहाजाला जलसमाधी मिळण्याआधी जहाजातील हजारो गॅलन तेल खाली करणे गरजेचे आहे.
जेएसडब्ल्यू रायगड हे जहाज धरमतरकडून जयगडच्या दिशेने कोळसा घेऊन 25 जुलै रोजी निघाले होते. प्रवासादरम्यान हवामान अतिशय खराब झाल्याने जहाजाच्या कॅप्टनला जहाजावर ताबा मिळवणे कठीण झाले होते. उसळणाऱ्या लाटा आणि सोसाट्याच्या लाटांचा मारा सहन करत सदरच्या जहाजावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे ते जहाज भरकटत अलिबाग-कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या खडकांवर आदळले. हा आघात मोठा असल्याने जहाजाला मोठे भगदाड पडले आहे. असे असतानादेखील जहाजावरील 14 खलाशी त्या जहाजावर अडकून पडले. जेएसडब्ल्यू प्रशासनाने जिल्हा प्रशासन आणि तटरक्षक दलाच्या मदतीने रेस्कू ऑपरेशन शुक्रवारी सकाळी 9 वाजता सुरु केले.
अडकलेल्या खलाशांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरमार्फत सुखरूप बाहेर काढण्यात आले. तटरक्षक दल, रायगड पोलीस यांनी संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. तब्बल 21 तासांनी सर्व खलाशांची सुटका झाली. 14 खलाशांना वाचवताना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टकरला सात फेऱ्या माराव्या लागल्या. त्यांना अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी सुखरुप उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. जहाजावरील सर्व खलाशी हे दहा विविध राज्यांतील आहेत. त्याची सर्वांची नोंद घेण्यात येऊन त्यानंतर सर्व खलाशांना जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. जहाज खडकावर आपटून फुटले आहे. तसेच, जहाजमध्ये हजारो गॅलन तेल आहे. याबाबतची पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी जेएसडब्ल्यू कंपनीची असल्याकडे सोमनाथ घार्गे यांनी लक्ष वेधले.
14 खलाशांची नावे
धनुष चिथिराईपंडीब कुमार (24) तामिळनाडू, अभिषेक हरेंद्र सिंग (22) यूपी, गोरख रामविजय सिंगचौधरी (32) यूपी, निलाद्री आशिषकुमार अधिकारी (23) पश्चिम बंगाल, अलरिनराज ज्ञानरपुथ राज (32) तामिळनाडू, विराज विश्वनाथ मेहेर (27) विरार, कोल्लमपरंबली अंतप्पन अँटनी (53) केरळ, पियुष सुरेंद्र लेंका (25) ओडिशा, प्रभात रामकुमार चौधरी (24) बिहार, अंबाडीमधर मोहनन के. (25) केरळ, डेनिस व्हिलिस्टन (22) तामिळनाडू, विजय जयनारायण सिंग (46) झारखंड, कोल्यामूर्ती परुमल (46) पाँडिचेरी, अभयप्रताप बलेंद्र यादव (25) यूपी अशी या 14 खलाशांची नावे आहेत.