। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या, पण काळजी करू नका, येत्या जून महिन्याअखेर या महामार्गाचे काम 100 टक्के पूर्ण होईल, अशी नवीन डेडलाईन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत बोलताना दिली आहे. परंतु, महामार्गाच्या एकंदरीत कामाच्या परिस्थितीवरून ही डेडलाईन हुकणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया कोलाडवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गासाठी अनेक अडचणी आल्या, त्यातून मार्ग काढत हे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. हे काम बराच काळ रेंगाळले असल्याची कबुलीदेखील नितीन गडकरी यांनी दिली आहे. परंतु, त्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. कारण, 2018 पासून या महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या अनेक डेडलाईन लोकनेत्यांकडून देण्यात आल्या आहेत. आता ही दिलेली डेडलाईन फेल जाणार असल्याचे दिसून येत आहे. कारण, कोलाड-आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण स्थितीत असून, हा पूल पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल, हेदेखील सांगता येत नाही. जून महिना संपण्यासाठी अडीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे या अडीच महिन्यात हे काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली डेडलाईन हुकणार असल्याची खात्री प्रवासीवर्गातून देण्यात येत आहे.