रेल्वे प्रवाशांचे हाल वर्षअखेरीस थांबणार?

दोनदा गाड्या थांबत असल्यामुळे गैरसोय

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकची लांबी कमी असल्याने जास्त डबे असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या दोन वेळा थांबत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. कधी सामान फलाटावर राहते, तर कधी प्रवासी घाईत गाडी पकडताना पडून अपघात होऊ शकतो. ही गैरसोय डिसेंबर 2026 नंतर होणार नाही. कारण, कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकची लांबी वाढविण्याचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे प्रशासनान सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांना लेखी कळविण्यात आहे.

कर्जत रेल्वे स्थानकावर एकूण तीन फलाट व एक इएमयु फलाट आहे. फलाट क्रमांक एकवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या येत असतात. परंतु, या फलाटाची लांबी कमी असल्याने जास्त डबे असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या दोन वेळा थांबविल्या जातात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूप धावपळ व हाल होतात. या गडबडीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच कर्जत रेल्वे स्थानकावर डब्याची स्थिती दर्शविणारे छोटे इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत. दोन वेळा गाडी थांबत असल्याने रेल्वे प्रशासनाला एकाचं ठिकाणी डबे दर्शविणारे दोन इंडिकेटर्स बसवावे लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो व कधी कधी गाडी चुकते, तर कधी सामान फलाटावर राहते. गाडी पकडण्याच्या नादात फलाटावर प्रवासी पडतसुद्धा आहेत.

लांब पल्ल्याच्या जास्त डब्यांच्या गाड्या कर्जत रेल्वे स्थानकातील एक नंबर फलाटावर दोन वेळा थांबविल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची धावपळ होत असे. याबाबत पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता फलाटाची लांबी वाढविण्यात येणार असून, हे काम फेब्रुवारी 2026 पूर्ण होणार असल्याचे कळविले होते. परंतु, सदर काम फेब्रुवारी 2026 परंतु न झाल्यामुळे ओसवाल यांनी पुन्हा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंगचे काम पूर्ण झाल्यावर कर्जत प्लॅटफॉर्मचा सीएसएमटी टोकाकडील विस्तार करण्यात येईल. यासाठी रेल्वे आयुक्तांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. काम पूर्ण होण्याची अंदाजित तारीख डिसेंबर 2026 आहे. असे ओसवाल यांना कळविले आहे.

Exit mobile version