लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित
| जालना | वृत्तसंस्था |
मनोज जरांगे यांनी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी लावून धरली आहे. तर, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठ्यांचा आरक्षणाचा वाद सुटणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, सरकारच्या आश्वासनानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आंदोलन स्थगित केले आहे. तर, मराठा नेते मनोज जरांगेंनी आंदोलन स्थगित हा सरकारचं षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (दि.22) उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत आहे, परंतु लढा पुढे सुरू राहील, असे स्पष्ट केले. गेल्या 10 दिवसांपासून ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ केलेले उपोषण लक्ष्मण हाके यांनी स्थगित केले आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री होते. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केले.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या विरोधात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण छेडले होते. गेल्या 10 दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेंसह अनेक नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता. परंतु, सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारने पटवून दिल्याने उपोषण स्थगित करत असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.
..तर मंडल आयोगाविरोधात आंदोलन; जरांगेचा सरकारला इशारा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन सरकारने दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केलं आहे. त्यांचं उपोषण स्थगित होताच मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात नवा एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाहीतर थेट मंडल कमिनशनविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिली. शनिवारी त्यांनी रुग्णालयातून पत्रकारांशी संवाद साधला. मराठ्यांनीही मतं दिली आहेत तुम्हाला, फडणवीससाहेब षडयंत्र हाणून पाडा. नाहीतर माझा नाईलाज आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास टाकला आहे. आरक्षण घेणार आम्ही आहेत. एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. एक जरी नोंद रद्द केली, तर मराठ्यांचा पुढचा लढा मंडल कमिशन रद्द करण्यासाठी असेल. आमच्या मुंडक्यावर पाय देऊन आमच्या हक्काचं असून, आम्हाला खायला देणार नसतील तर इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशनविरोधात असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.