नवी दिल्लीत पुन्हा बैठक
| नवी दिल्लीत | वृतसंस्था |
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र, त्यावर सकारात्मक तोडगा निघू शकलेला नाही. जागावाटपावर आता अंतिम तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी (दि. 11) महायुतीच्या नेत्यांची शाह यांच्याकडे बैठक होणार आहे. त्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपासंदर्भात सध्या महायुतीमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. भाजपकडून महायुतीमधील जोडीदार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक अंकी जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात शिवसेनेला आठ ते नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ते चार जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते समाधानी नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही जागावाटपाचा तिढा कायम आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात बैठक झाली. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत ठोस असा तोडगा निघू शकलेला नाही. भाजपकडून देण्यात येत असलेल्या जागा मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस घ्यायला तयार नाहीत. त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. सोमवारी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल, असे सांगण्यात येत आहे.