क्रॉस वोटिंग करणार्यांना काँग्रेस देणार दणका
| मुंबई | प्रतिनिधी |
काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली होती. मात्र, पक्षाला दगाफटका देणार्या या आमदारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याच्या सूचना थेट काँग्रेस हायकमांडकडून राज्य पातळीवरील नेत्यांना देण्याची आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय आहे, त्यामध्ये हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, झिशान सिद्दिकी आणि मोहन हंबर्डे यांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही आमदारांना काँग्रेस तिकीट देणार नसल्याचे समजते. दरम्यान, क्रॉस वोटिंगच्या आरोपामुळे ज्या आमदारांचं तिकीट कापलं जाणार आहे, त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसकडून युवा चेहर्यांना संधी दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नक्की कोणत्या आमदारांचं तिकीट कापणार आणि त्यांच्या जागी कोणाला संधी देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.