अश्विनच्या फिरकीपुढे विंडीज ढासळली

भारताची दमदार सुरुवात

| बार्बाडोस | वृत्तसंस्था |

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळविण्यात सुरुवात केली आहे.यजमानांचा पहिलाच डाव फिरकी गोलंदाज आर.अश्विनच्या गोलंदाजीपुढे ढासळला.पहिला डाव अवघ्या 150 धावातच आटोपला.अश्विनीने पाच गडी बाद केले. दिवसाखेर भारत बिनबाद 80 धावावर खेळत होता. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडूनी यशस्वी जैस्वाल शान किशन या दोघांनी पहिल्यांदा कसोटी खेळण्याची संधी मिळाली. यष्टिरक्षक के.एस. भरतच्या जागी त्याची निवड करण्यात आली. विराट कोहलीने इशानकडे कसोटी कॅप दिली.तर वेस्ट इंडिजकडून ॲलिक अथेनेझने पदार्पण केले.

पहिल्या डावात वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. त्यांचा निम्मा संघ 76 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रविचंद्रन अश्विनने विंडीजला पहिला धक्का दिला. 13 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने तागेतारीन चंद्रपॉलला बाद केले. 44 चेंडूत 12 धावा करून चंद्रपॉल त्रिफळाचित केले. यानंतर अश्विनने कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने ब्रॅथवेटचा झेल घेतला. त्याला 46 चेंडूत केवळ 20 धावा करता आल्या. यानंतर शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्या आणि डावाच्या 20 व्या षटकात संघाला यश मिळवून दिले. त्याने रेमन रेफरला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. रेफरला 18 चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. इशानचा हा कसोटीतील पहिला झेल आहे.

रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजला चौथा धक्का दिला. त्याने जर्मेन ब्लॅकवूडला मोहम्मद सिराजकरवी झेलबाद केले. ब्लॅकवूडने 34 चेंडूत 14 धावा केल्या. डायव्हिंग करताना सिराजने शानदार झेल घेतला.उपहारापूर्वी वेस्ट इंडिजने गडी गमावत 68 धावा केल्या होत्या. उपाहारानंतर लगेचच विंडीजला पाचवा धक्का बसला. रवींद्र जडेजाने जोशुआ डी सिल्वाची सुटका केली. जोशुआला 13 चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. त्याने यष्टिरक्षक इशान किशनकडे झेल सोपवला.

76 धावांत पाच गडी बाद झाल्यावर नवोदित ॲलिक अथेनेझ आणि अनुभवी जेसन होल्डर यांनी डाव सांभाळला. दोघांनी सावध फलंदाजी करत सहाव्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. विंडीजसाठी पहिल्या डावातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. मोहम्मद सिराजने भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने जेसन होल्डरला शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद करून ही भागीदारी मोडली. होल्डर 61 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. अश्विनने भारताला सातवे यश मिळवून दिले आहे. त्याने अल्झारी जोसेफला जयदेव उनाडकटकरवी झेलबाद केले. जोसेफने 11 चेंडूत 4 धावा केल्या.
ॲलिक अथेनेझचे अर्धशतक हुकले. पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने बराच वेळ संघर्ष केला. अथेनेझ 99 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. अश्विनने अथेनेझला शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद केले. जडेजाने भारताला नववे यश मिळवून दिले. त्याने केमार रोचला एलबीडब्ल्यू केले. त्यानंतर अश्विनने जोमेल वॅरिकनला बाद करत वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळला. रोच आणि वॅरिकन यांनी प्रत्येकी एक धाव केली. भारताकडून अश्विनने पाच आणि रवींद्र जडेजाने तीन घेतल्या. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक असे गडी टिपले.

अश्विनचा विक्रम
सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉलला अश्विनने बाद केले. यासोबतच अश्विननं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पिता-पुत्र दोघांनाही कसोटीत बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी 2011 मध्ये रवी अश्विननं तेजनारायण चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल यांना आऊट केलं होतं.

भारताची छान सुरुवात
रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या डावात भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी काही अप्रतिम फटके मारले. यशस्वी 73 चेंडूत 40 धावा करून नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार मारले आहेत. त्याचबरोबर रोहितने 65 चेंडूत 30 धावा केल्या आहेत. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. भारत पहिल्या डावात वेस्ट इंडिजपेक्षा 70 धावांनी पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, सामन्यात पुनरागमन करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसरत करावी लागणार आहे.

Exit mobile version