। मुंबई । प्रतिनिधी ।
करीरोडच्या अशोक मंडळाने मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित कुमार गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमुळे हा अंतिम सामना खेळविण्यात आला नव्हता. आज तो खेळविण्यात आला.
वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणात झालेल्या अंतिम सामन्यात अशोक मंडळाने श्री गणेश क्रीडा मंडळाचा 39-12असा सहज पाडाव करीत पहिल्यांदाच कुमार गटाचे जेतेपद मिळविले. या मोसमातील त्यांचे हे सलग दुसरे जेतेपद. आक्रमक सुरुवात करीत अशोक मंडळाने श्री गणेश मंडळावर 2लोण देत पूर्वार्धातच 23-06अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. उत्तरार्धात नियंत्रित व संयमाने खेळ करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ओमकार कामतेकर, मयुरेश परब यांच्या झंझावाती चढाया त्याला शशांक मोकल, ओम डाफळे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा झाला. श्री गणेश मंडळाच्या खेळाडूंचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. त्यातल्यात्यात तेजस शिंदे बरा खेळला.