| पॅरिस | वृत्तसंस्था |
क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरेओ पुरस्कारासाठी यंदा सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि स्पेनची महिला फुटबॉलपटू ऐताना बोनमती यांची निवड करण्यात आली. जोकोविचने गेल्या वर्षी एटीपी फायनल्ससह तीन ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवली होती.
कारकीर्दीत विक्रमी 24 ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवणारा जोकोविच पाचव्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला. जोकोविचने येथेही स्वित्झर्लंडचा 20 ग्रँडस्लॅम विजेता माजी टेनिसपटू रॉजर फेडररशी बरोबरी केली. माद्रिद येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महिला विभागात या पुरस्काराची मानकरी ठरलेली बोनमती हा सन्मान मिळवणारी पहिली फुटबॉलपटू ठरली आहे. या वेळी महिला विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचाही सन्मान करण्यात आला. प्रथमच ही स्पर्धा जिंकल्याबद्दल त्यांना 2023 वर्षातील सर्वोत्तम संघ म्हणून निवडण्यात आले.