कोकणात थंडी उशिरा सुरु; आंब्यासह काजू उत्पादक चिंतेत

यंदा हापूस उशिरा मिळणार

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

शेतकर्‍यांना सातत्यानं नवनवीन संकटांना सामोरं जावं लागतं. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. यावर्षी कोकणात थंडी उशिराने सुरु झाली आहे. त्यामुळं कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा मोसम उशिरा असणार आहे.

दिवाळी झाली तरी अपेक्षित थंडी पडली नसल्याने हापूसच्या कलमांना मोहोर दिसतच नाही. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे फुले येण्यासाठी 13 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान सात दिवस असणे आवश्यक आहे. थंडी जर चांगल्याप्रकारे पडली नाही तर आंब्याला मोहोर चांगल्या प्रकारे येत नाही. आला तर तो उशिरा येतो. त्याचा फळ उत्पादनावर परिणाम होतो. वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याचा हंगाम लांबल्यास मिळणार्‍या दराबाबत देखील शेतकरी चिंतेत आहेत.

तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव
बदलत्या वातावरणामुळं कोकणात काही ठिकाणी आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरु आहे. याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. यामुळं आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी झाडांना मोहर आलेला नाही तर काही ठिकाणी मोहरामध्ये फळधारणा झालेली आहे. यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळं आंबा बागायतरांवर संकट निर्माण झालं आहे.

फवारणीसाठी मोठा खर्च
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्यावर तु़डतुडा आणि थ्रीप्स अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याचा आंब्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळ हापूस आंब्याच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली आहे. बाग चांगली ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना औषधांसाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याची माहिती देखील शेतकर्‍यांनी यावेळी दिली आहे. या फवारण्याचा खर्चही मोठा असणार आहे. त्याचा शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे.

Exit mobile version