विजेचा धक्का लागून महाळूंगे येथे वायरमन जखमी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

महाळूंगे येथे विज दुुरुस्तीचे काम करत असताना अचानक सुरु झालेल्या विजप्रवाहामुळे विजेचा जोरदार धक्का लागून पोलवरुन वायरमन खाली पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वायरमनला पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उमेश नारायण पाटील वय 44 रा. काकळघर तालुका मुरुड असे या वायरमनचे नाव आहे. महाळूंगे बुदू्रक येथे नादुरुस्त झालेल्या ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यासाठी उमेश पाटील हे पोलवर चढून काम करत होते. त्यावेळी अचानक विज प्रवाह सुरु झाल्याने दुरुस्तीचे काम करत असलेल्या उमेश पाटील यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या तीव्र धक्क्याने उमेश पाटील हे पोलवरुन जमिनीवर कोसळले. हा प्रकार कळताच काकळघर ग्रामपंचायतीचेे माजी सरपंच संतोष कांबळी यांनी उमेश पाटील यांना तातडीने बोर्लीमांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या पायाला फॅक्चर झाल्याचे निदान करण्यात आले असून अधिक उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे उमेश पाटील यांना अंपगत्व आले असून महावितरण कंपनीने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version