बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांसह; बाजारपेठाही सज्ज

। सुतारवाडी । हरिश्‍चंद्र महाडिक ।
राज्यात पावसाचा जोर ओसल्याची चिन्हे असून गणेशोत्सवासाठी अवघे तेरा दिवस उरले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व गणेशभक्तांची लगबग सुरू झाली असून त्यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत.
सामाजिक एकोपा आणि वैचारिक देवाणघेवाण यामधून राष्ट्रीय स्तरावर जनजागृती अशा दुहेरी उद्दिष्टांतून लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आजही संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात, जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणामध्ये साजरा होत असतो.
गतवर्षी कोरोनाच्या प्रचंड कहरामुळे राज्यात अत्यंत साधेपणाने गणशोत्सव साजरा केला होता. कोरोना काळात आपल्या गावाकडे परतलेली मंडळी गावाकडेच होती. एस.टी.च्या फेर्‍या ही बंद होत्या. त्यामुळे मुंबई, ठाणे, सुरत, गुजरात, बोरीवली अशा ठिकाणाहून गणपती सणासाठी आपल्या गावाकडे येण्याचा प्रश्‍न गणेश भक्तांना उद्भवला नव्हता. बाजारपेठांमध्येही म्हणावा तेवढा गदारोळ नव्हता.
या वर्षी कोरोनाचा कहर जरी कमी असला तरी शासनद्वारे मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यंदाही कोरोनाच्या सावटाखालीच गणेशोत्सव साजरा होणार आहे. पण जरी असे असले, तरीही आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या तेरा दिवसांवर आले असून त्याच्या स्वागतात आणि आदरातिथ्यात कोणतीही उणीव राहायला नको, आनंद सोहळ्यात काही कमी राहायला नको म्हणून गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे.
अर्थात बाप्पाच्या मुर्त्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या पेणमधून देशविदेशात मुर्त्यांची निर्यात झाली असून जिल्ह्यातील विविध बाजारपेठ्यांमध्ये त्यांची आयात झाली आहे. स्थानिक कलाकेंद्रातही कलाकार मुर्तींवरून अंतीम हात फिरवताना दिसत आहेत. सणउत्सवासाठी बाजारपेठेतील अन्य विक्रेते, दुकानदारही सज्ज झाले असून त्यांचींही ग्राहकांच्या गर्दीत तारांबळ उडताना आढळत आहे.
रोजगारासाठी शहराकडे राहणारे चाकरमानीही आपल्या गावाकडे येण्यास सज्ज झाले असून गाड्यांचे आरक्षण ही सुरू झाले आहे.

Exit mobile version