वसंत ॠतूच्या आगमनाने रानवनात चैतन्य

विविध रंगांच्या फुलांची मुक्तपणे उधळण
| माणगाव | प्रतिनिधी |
ऋतुचक्रानुसार रूप बदलणार्‍या रानात वसंत ॠतूचे आगमन झाले आहे. निसर्गात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे भारतीय ऋतू निसर्गातील विविध बदलांची नांदी देतात. याच काळात शिशिराची पानगळ होऊन अनेक झाडांना कोवळी पाने, पालवी यायला सुरुवात होते. शिशिर संपून वसंत ऋतूची सुरुवात याच काळात झालेली असते. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर रानावनात विविध बदल होतात. अनेक झाडांना फुलोरा येतो. पानगळ झालेली अनेक झाडे फक्त फुलांनी नखशिखांत फुलांनी बहरलेली असतात.

निसर्गाला नवे रूप देणारा हा ऋतू शेती आणि शेतकर्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. रानात शिशिराची पानगळ झाली असून, झाडांची पाने पिवळीगर्द होऊन गळून पडली आहेत. या गळतीमुळे रानात सर्वत्र पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या ऋतूतील सणही ऋतूमानाचा विचार करून आहार विहार देतात. झाडांची झालेली पानगळ शेतकर्‍यांना ऊर्मी देऊन जाते. झाडांचा गळलेला हाच पालापाचोळा शेतकरी शेतीसाठी वापरतात.



रंगपंचमीच्या पर्वात रानाची शोभा वाढविणारी गंध उधळणारी ही फुले कोकणातील सह्याद्री पर्वताची शोभा असून, रानफुलांचा हा बहर म्हणजे जणू रानाची रंगपंचमी होय. होळी उत्सवाच्या या काळात रानात झाडांना बहरलेला फुलोरा आलेला दिसतो. यामध्ये काटेसावर, पळस, चाफा, बोगनवेल ,बहावा, पांगिरा, ताम्हण, धामण,अर्जुन तसेच घराच्या परसदारी ,बागेतून मोगरा,जाई-जुई, निशिगंध,जास्वंद अशी अनेक फुलझाडे बहरलेली दिसतात ती वेगळीच अशा या झाडांची बहरलेली शोभा रानावनात तर दिसतेच सोबतीला घराच्या अंगणात परसदारी भागातून अनेक झाडे फुललेली दिसतात. यावर्षी रविवार, दि. 12 मार्च रोजी रंगपंचमी सर्वत्र उत्साहात साजरी झाली. या आनंदात निसर्गात बहरलेली रानफुले अधिकच उठावदार दिसत आहेत. रंगपंचमीच्या या पर्वात रानात बहरलेली ही फुले विविध नैसर्गिक रंगांसाठी उपयुक्त असून, या रानफुलांचा उपयोग पर्यावरण पूरक रंग तयार करण्यासाठी होतो. ग्रामीण शहरी भागात रंगपंचमीसाठी निसर्गातील या पानाफुलांचा अनेक जण आवर्जून वापर करतात.

या सर्व फुलांनी वसंत ऋतूचे वैभव बहरून येते. माळरानांवर याबरोबरीने अनेक छोटया मोठया वनस्पती फुलून येतात. होळीच्या रंगपंचमीचा हा ऋतू रानात फुलांचा पंचमस्वर आळवित आहे आणि या स्वरांचा आनंद याची देहि याची डोळा घ्यावयास हवा. माणसांच्या रंगपंचमी बरोबर या दिवसात निसर्गाचीही रंगपंचमी साजरी होत आहे.

Exit mobile version