पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनाची ऐशीतैशी

बेडिसगावचा रस्ता नव्या जागेतूनच
ठेकेदाराच्या कृतीने ग्रामस्थ संतप्त
। नेरळ । प्रतिनिधी ।
पालकमंत्र्यांनी आश्‍वासन देऊनही कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील दोन महिन्यांपूर्वी उखडून टाकलेला रस्ता ठेकेदाराने नवीन जागेतून बनविला आहे. जुना रस्ता होता त्याच जागेतून नेण्यात येईल असे आश्‍वासन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण करणार्‍या आदिवासी लोकांना दिले होते. मात्र रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्या मदतीने नवीन जागेतून रस्ता तयार करून घेतला आहे. दरम्यान, रस्ता खोदून नव्या जागेतून केला जाऊ शकतो ही प्रथा आता रूढ होण्याची शक्यता असून बेडीसगाव आणि नऊ आदिवासी वाड्यांमधील लोकांची फसवणूक झाली आहे.

बेडीसगाव रस्त्याचे काम करणारे ठेकेदार सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन राजकीय पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरून बेडीसगाव येथे वादग्रस्त खोदलेल्या रस्त्याचे काम सुरु केले. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी ठेकेदाराला अडविण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नवीन जागेतून रस्ता करायला सांगितले आहे असे ठेकेदार आदिवासी लोकांना सांगत होता. तर तेथे उपस्थिती असलेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रल्हाद गोपणे यांनी रस्त्याचे काम नियमानुसार सुरु असल्याचे सांगून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. शेलू ग्रामपंचायत चे माजी सदस्य मंगळ दरवडा यांनी स्थानिक आदिवासी लोकांसह रस्त्याचे काम अडविण्याचा प्रयत्न केला,त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी दरवडा यांना सुरु असलेली काम थांबवू नका अशी सूचना करीत होते. तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी बंदोबस्त देत होते.त्यामुळे बेडीसगाव मधील आदिवासी ग्रामस्थांचे काही चालले नाही.शेवटी ग्रामस्थांचा विरोध असून देखील बेडीसगाव ला जाणारा रास्ता बनविण्यात आला.

पालकमंत्री प्रभावहिन
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या रस्त्याच्या प्रश्‍नावर बैठक घेणार असे पालकमंत्री यांनी सांगितलेले असताना ती बैठक होत पर्यंत महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांचे अधिकारी थांबू शकत नाही. याचा अर्थ पालकमंत्री यांची प्रशासनावर कमांड नाही असा अर्थ बेडीसगाव मधील आदिवासी यांच्याकडून काढला जात आहे. पालकमंत्री यांच्याकडून आदेश असताना ठेकेदार कंपनी कडून दुसर्‍या दिवशी रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्त लावून कसे काय केले जाऊ शकते आणि पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी ठेकेदराने किंवा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे मंजुरी कधी घेतली असे अनेक प्रश्‍न बेडीसगाव मधील ग्रामस्थ यांनी उपस्थित केले आहेत.

सरकारी यंत्रणा यांचा गैरवापर करून ठेकेदाराने अधिकारी वर्गाला हाताशी धरून आपल्या मर्जीप्रमाणे रस्त्याचे काम केले आहे. त्याचा जाब त्यांच्याकडून विचारला जाईल आणि आपल्या अधिकारा बाहेर जाऊन ठेकेदाराला मदत करणार्‍या अधिकार्‍यांची शासनाने चौकशी करावी अशी मागणी आम्ही वरिष्ठ पातळीवर करणार आहोत.

मंगळ दरवडा- ग्रामस्थ
Exit mobile version