चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने उभे राहतेय पर्यटन क्षेत्र

उमटे धरण पाहण्याला पर्यटकांची पसंती

| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. गाळ काढण्यासाठी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई तसेच माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. उमटे धरणासाठी एक सामाजिक चळवळ सुरु झाल्याने त्याची दखल आता समाजातीलच नागरिक घेताना दिसत आहेत. वॉटरपार्क अथवा अन्य ठिकाणी पर्यटन करण्याएैवजी उमटे धरणाला ते भेट देत असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उमेट धरणातील गाळ काढण्याचा प्रश्‍न चांगलाच एैरणीवर आला होता. चिंचोटी येथील अ‍ॅड. राकेश पाटील या तरुणाने या प्रश्‍नाला वाचा फोडली होती. उमटे धरण गाळाने प्रचंड प्रमाणात भरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. सरकार, प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुनदेखील कोणीच लक्ष देत नसल्याने परिसरातील 48 गावे आणि 33 आदिवासीवाड्यांतील नागरिकांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. हा प्रश्‍न अ‍ॅड. राकेश पाटील या तरुणाने समाजमाध्यमांवर चांगलाच पेटवला. त्यांनी समाजातून मदतीचा हात मागितल होता. त्याला शेकापचे नेते प्रशांत नाईक, शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नृपाल पाटील यांनी तत्काळ मदतीचा हात दिला.

दरम्यान, शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांची भेट घेतली. गाळ काढा अथवा गाळ काढण्याची आम्हाला परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली त्याला बास्टेवाड यांनी लागलीच प्रतिसाद देत परवानगी दिली. निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के, अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील यांनी देखील आवश्यक असणारी प्रशासकीय मदत केली.

सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गाळ निघाल्याने तब्बल 50 लाख लिटर अतिरीक्त पाण्याचा साठा होणार आहे. असचे काम सुरु राहिल्यास कोट्यवधी लिटर अतिरीक्त पाण्याचा साठा होण्यास मदत मिळणार आहे. उमटे धरणाचा विषय गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चीला जात आहे. त्यामुळे उमटे धरण कोठे आहे, कसे आहे, हे पाहण्यासाठी आता अलिबाग तालुक्यातील गावातील नागरिक येत आहेत.

रविवारी आतिश पाटील, लावण्या पाटील, प्रगती मानकर, चैतन्य, सुहास कारुळकर यांच्यासह अन्य पर्यटनासाठी आले होते. निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा आनंद त्यांना झाला. वॉटर पार्क अशा ठिकाणी पैसे खर्च करुन जाण्यापेक्षा अशा ठिकाणी भेट दिल्याने मन प्रसन्न झाल्याचे लावण्या पाटील हिने सांगितले.

उमटे धरणातील पाणी कुंठ्यांची गोठी या गावापर्यंत आधी पाणी यायचे आता ते येत नाही, परंतु गाळ काढण्याच्या चांगल्या उपक्रमामुळे या वर्षी उमटे धरणाचे पाणी आमच्या गावात नक्कीच येईल, असे प्रगती मानकर यांनी सांगितले.

गाळ काढण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहीली आहे. या बद्दल सर्वांचेच मनापासून कौतुक करतो. येथे काम करणार्‍यांसाठी काही अल्पपोहर देता आला यात मला समाधान आहे. प्रशासनाने देखील यात लक्ष घालून काम मार्गी लावावे, असे आतिष पाटील यांनी सांगितले.

प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्यामुळे उमटे धरणातील गाळ काढला जात आहे. ग्रामस्थांच्यावतीने मी सर्वांचे आभार मानतो. धरणावर भेट देण्यासाठी, पर्यटनासाठी नागरिक येत आहेत. भविष्यात उमटे धरण परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत झाल्यास नवल वाटायला नको, असे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version