वेश्वी, नवेदर नवगावमध्ये प्रत्येकी दोन सरपंचासह 48 रिंगणात; कोप्रोलीत एकमेव उमेदवार बिनविरोध
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. यावेळी चार सरपंच पदासह 48 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता वेश्वी आणि नवेदर नवगाव येथे थेट सरपंचपदासाठी प्रत्येकी दोन तर सदस्यपदासाठी प्रत्येकी 22 असे एकुण 48 उमेदवारांमध्ये लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
वेश्वी येथील सरपंच तसेच सदस्य पदाचे सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर उर्वरित सरपंच पदाच्या पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता येथे रिंगणात उरलेल्या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत रंगणार आहे. शेकापकडून वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील हे थेट सरपंचपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये मोठया प्रमाणावर विकासकामे केली असल्याने त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात निभाव लागणार नसल्याची भीती असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटासोबत जात आघाडी केली आहे. येथे 11 सदस्यपदांसाठी वैध ठरलेल्या 45 पैकी 23 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 22 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
नवेदर नवगाव येथे थेट सरपंचपदासाठी वैध ठरलेल्या चार उमेदवारांपैकी दोघांनी आज शेवटच्या मुदतीत माघार घेतली. त्यामुळे येथे देखील दोन उमेदवारांमध्ये थेट लढत रंगणार आहे. तर 11 सदस्यपदांसाठी वैध ठरलेल्या 42 पैकी 20 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले असल्याने आता उर्वरित 22 उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे. 15 वर्षे प्रशासक असलेल्या नवेदर नवगाव ग्रामपंचायतीत तब्बल 15 वर्षांनी निवडणूक प्रक्रियेत ग्रामस्थ सहभागी होत आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहेत.
जात दाखल्याच्या वैधता प्रश्नांमुळे कोप्रोली येथील निवडणूकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला असून 7 जागांपैकी एकमेव सदस्यपदासाठीचा वैध ठरलेला उमेदवारी अर्ज कायम असल्याने त्याची बिनविरोध निवड झाली आहे. आता तालुक्यात 31 सदस्यपदांसाठी 24 तर तीन थेट सरपंच पदासाठी 4 अर्ज निवडणूक रिंगणात उरले आहेत.