भाजप पदाधिकाऱ्याचा शहापूरमधून अर्ज मागे
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेली एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने शहापूर मतदारसंघातून दाखल केलेला जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज मंगळवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मागे घेतला आहे. त्यामुळे उमेदवारीचा ‘आस्वाद’ घेण्यापूर्वीच माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सदर पदाधिकाऱ्याने भाजपमध्ये प्रवेशानंतर शहापूर मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने स्थानिक राजकारणात हालचाली वाढल्या होत्या. त्यांच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, ऐन माघारीच्या दिवशी त्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या माघारीमागे पक्षांतर्गत चर्चा, स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते तसेच आगामी रणनीती कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मात्र, संबंधित पदाधिकारी किंवा भाजपकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जागांवर भाजप आणि शिंदे गटात अलिबागमध्ये वाद सुरु होते. चेंढरेसह अनेक जिल्हा परिषद मतदार संघात भाजपने उमेदवार उभे केले असताना, शिंदे गटानेदेखील उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामुळे एकमेकांविरोधात रस्सीखेच सुरु होती. एकमेकांना पाण्यात बघण्याचे काम केले जात होते. भाजपच्या एका उमेदवाराने शहापूर मतदार संघात उमेदवारी अर्ज भरला होता. शिंदे गटाकडून भाजपवर तीव्र टीका करण्यात आली होती. भाजपच्या या उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे नक्की काय भूमिका आहे, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटाविरोधात पुढील भाजपचे काय धोरण असणार याकडे अलिबागकरांचे लक्ष लागून राहिले आहे.







