| पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीत राहणाऱ्या वंदना कुलाळ यांना आपल्या मुलाच्या शाळेची फी भरायची होती. त्यामुळे त्या आपल्या पतीचे एटीएम कार्ड घेऊन शाळेजवळील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये गेल्या होत्या. त्यांना एटीएम मशीनचा वापर करता येत नसल्याने तेथील एका व्यक्तीची मदत घेतली. त्या व्यक्तीने हातचलाखीने महिलेचे एटीएम स्वतःजवळ ठेवले आणि हुबेहूब त्याचसारखे दिसणाऱ्या दुसऱ्या एटीएमचा वापर करीत त्यांच्याकडून पिन नंबर विचारून घेतला. त्यानंतर काहीतरी बहाणा करून त्याने तेथून पलायन केले. या कार्डमधून पैसे येत नसल्याने त्या निघून गेल्या. त्या गेल्या नंतर चोरट्याने एटीएममध्ये जाऊन चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करून 40 हजार रुपये काढले. त्याचा मेसेज वंदना कुलाळ यांना येताच त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.






