| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
दिल्लीत मनी लाँडरिंग व ह्युमन ट्रॅफिकिंगशी निगडीत आपल्यावर गुन्हा नोंद असल्याचे सांगून सावंतवाडीतील एका महिलेची 1 लाख 26 हजार रुपयाना ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल सायबर क्राईम या अधिकृत पोर्टलवर याबाबतची तक्रार नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सावंतवाडीतील एका महिलेला 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता फोन आला होता. त्यात तिला तुमच्या एचडीएफसी बँकेतील खात्यात 60 कोटींच्या अनधिकृत व्यवहारांचा तपास सुरू आहे, जो मनी लाँडरिंग व ह्युमन ट्रॅफिकिंगशी संबंधित आहे. तसा गुन्हा दिल्लीत दाखल झाला आहे असे सांगितले. याबाबत खात्री व्हावी याकरिता तिच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करत आपण अधिकारी असल्याचे दाखवून दिले. जर तुम्ही निर्दोष असाल, तर चौकशीनंतर तुम्हाला क्लीन चिट मिळेल. मात्र, या प्रकरणात तुम्ही सहकार्य करणे आवश्यक आहे, असे सांगून आपल्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे सांगून 25 तासांच्या कालावधीत कुठेही बाहेर न जाण्याचा व कोणालाही माहिती न देण्याचा आदेश दिला. या प्रकरणातील गोपनीयतेचे कारण सांगून पोलिसांपर्यंत जाणे टाळण्याचेही सुचवण्यात आले. चौकशीचे नाटक करत संबधीतांनी तिच्याकडून 1 लाख 26 हजार रुपये उकळले. सायबर ठगांच्या सततच्या दबावामुळे तिने ऑनलाइन रक्कम त्यांना हस्तांतरित केली. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे त्या महिलेला उशिरा लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत नॅशनल सायबर क्राईमच्या पोर्टलवर तक्रार नोंद केली. याबातचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण करत आहेत.