आगरसूरे फाट्यावर महिलेला एसटीने चिरडले; नुकसान भरपाईसाठी शेकापची मागणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रस्ता ओलांडणार्‍या आदिवासी महिलेचा एसटी बस खाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर अपघात आगरसूरे फाट्यावर मंगळवारी (दि. 27)  सकाळी 8.50 च्या सुमारास घडला. रंजना किसन भस्मा 30 रा. सडावाडी, बेणसे तालुका पेण असे या अपघातात मृत्यू झालेल्या आदिवासी महिलेचे नाव आहे. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांना एसटीकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यासाठी शेकापक्षाच्या शिष्टमंडळाने अलिबाग आगार व्यवस्थापकांची भेट घेतली.

अलिबाग आगाराची (एमएच 14 बीटी 2273) ही सासवणे पनवेल सकाळी 8.20 वाजता सासवणे येथून निघाली. सदर बस आगरसुरे फाटा येथे आली असता अलिबागकडे जाणार्‍या रंजना किसन भस्मा यांनी बस चालकाला हात करीत बस थांबवण्याचा प्रयत्न करीत रस्ता ओलांडू लागल्या. मात्र बस न थांबवता चालक शैलेश केशव पाटील यांनी सुरूच ठेवल्याने बसची जोरदार धडक बसून रंजना या बसखाली सापडल्या. बसच्या चाकाखाली चिरडल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेल्या पती किसन भस्मा यांच्या समोरच त्यांचा अपघात झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. सदर अपघात होताच बस चालक शैलेश पाटील हा मांडवा सागरी पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सदर महिला ही रस्ता ओलांडत असताना सदर अपघात झाला असल्याचे आगार व्यवस्थापक वनारसे यांनी सांगितले.

सदर अपघाताचे वृत्त कळताच, शेकापक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे यांच्यासह किसन काष्टे, केशव वारगुडे, धर्मेश गडखळ, जी जी मेंगाळ, जानु शिद आदींनी अलिबाग एसटी आगारात धडक देत आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची तसेच एसटी चालक याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी एसटी कडून तातडीची मदत देण्यात येणार असून नुकसान भरपाईसाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासीत केले.

Exit mobile version