| माणगाव | वार्ताहर |
तालुक्यातील मांजरवणे गावातील 24 वर्षीय विवाहित महिलेचा सर्प दंशाने मृत्यू झाला. दनिया हाशिम हर्णेकर (वय -24) असे विवाहित महिलेचे नाव आहे. दनियाला सोमवारी सकाळी सर्पदंश झाल्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान, तीचा दुपारी मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. माणगाव व गोरेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परीस्थीती आटोक्यात आणली. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून त्यांना कायदेशीर मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. उपचार करण्यास डॉक्टरांनी बिलंब केल्याने दनियाचा मृत्यू झाल्याची तक्रार महिलेचा दिर महेफुज हर्णेकर रा. मंजरवणे ता. माणगाव यांनी माणगाव पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गोमसाली यांनी याचा इन्कार केला आहे. डॉक्टरांनी तिच्यावर लगेचच औषधोपचार सुरू केले. आवश्यक ती सर्व औषधे वापरण्यात आली परंतु तिच्याकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.