नोकरीचे आमिष दाखवून महिलेला नऊ लाखांना गंडा

। पनवेल । प्रतिनिधी ।

तळोजा भागात घरकाम करणाऱ्या 30 वर्षीय महिलेला चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून भामट्याने तिच्याकडून रोख रक्कम आणि दागिने असे एकूण 9 लाख 70 हजार रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष वाळुंज (45) असे या भामट्याचे नाव असून, तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महिला मनस्वी जाधव (30) या तळोजा फेज-1 मध्ये आपल्या कुटुंबासह राहण्यास आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये त्या घरकाम शोधत असताना त्यांची ओळख शेजारील साई रिव्हरडर इमारतीत राहणारा संतोष वाळुंज यांच्याशी झाली. वाळुंज याने मनस्वी यांना आपल्या घरात घरकामासाठी ठेवले. त्यानंतर महिनाभरातच त्याने मनस्वी आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करुन मनस्वी यांना चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी काही खर्च करावा लागेल असेही सांगितले. जर 3-4 महिन्यात काम झाले नाही, तर संपूर्ण पैसे परत करण्याचे आश्वासन देखील त्याने दिले. मनस्वी यांनी वाळुंज याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 2 लाख रुपये दिले. त्यानंतर वाळुंज याने कामाच्या प्रकृतीचे कारण सांगून त्यांच्याकडून आणखी 14 हजार रुपये उकळले. तसेच मनस्वी यांच्या घरातील तब्बल 11 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने स्वतःकडे जमा करुन घेतले. मनस्वी यांनी सर्व पैसे आणि दागिने दिल्यानंतर देखील संतोष वाळुंज याने त्यांना कोणतीही नोकरी मिळवून दिली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनस्वी जाधव यांनी तळोजा पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी संतोष वाळुंज याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version