पिता- पुत्रा विरोधात गुन्हा दाखल
। नागोठणे । प्रतिनिधी ।
वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादावरून कोयत्याने वार करून झालेल्या हल्ल्यात एका 47 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नागोठण्याजवळील शिहू ता. पेण गावात शनिवारी (दि. 11) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शिहू गावातील पिता – पुत्रावर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी क्रमांक 1 द्वारकानाथ काशिनाथ म्हात्रे रा. शिहू, ता. पेण यांची आई मुक्ताबाई म्हात्रे यांनी या घटनेतील जखमी तक्रारदार भारती यशवंत म्हात्रे (47) रा. शिहू, ता. पेण यांना शनिवारी (दि.11) सायंकाळी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी क्रमांक 1 द्वारकानाथ म्हात्रे याने हातात कोयता घेऊन जखमी तक्रारदार भारती म्हात्रे यांच्या घरात घुसून भारती म्हात्रे यांचा गळा डाव्या हाताने धरला आणि उजव्या हातात आणलेल्या कोयत्याने तक्रारदार भारती म्हात्रे यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. त्यामुळे तक्रारदार भारती म्हात्रे यांच्या मनगटाला दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतरही आरोपी द्वारकानाथ म्हात्रे व त्यांचा मुलगा विशाल द्वारकानाथ म्हात्रे यांनी तक्रारदार भारती म्हात्रे यांना शिवीगाळ करून हाता बुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकीय अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा हे पुढील तपास करीत आहेत.






