। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातून वाईकडे सासरी जाण्यासाठी निघालेली एक महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाली असून, याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना संबंधित महिलेबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे. रेखा देवराम सकपाळ (36)असे बेपत्ता महिलेचे नाव असून, त्या मूळच्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर गावच्या रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.6) सकाळी साडेसहाच्या सुमारास त्या शिवथरघळ येथून कल्याणकडे जाणाऱ्या एस.टी. बसने महाड येथे आल्या होत्या. त्यानंतर महाडहून वाई येथे सासरी जाण्यासाठी निघाल्या; मात्र त्या अद्याप घरी पोहोचल्या नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. कोणताही ठावठिकाणा न लागल्याने शनिवारी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
रेखा सकपाळ यांचे वर्णन गहूवर्णीय असून, उंची सुमारे साडेचार फूट आहे. चेहरा गोल, केस काळे व लांब, डोळे काळे आणि अंगाने बांधा मध्यम आहे. घरातून निघताना त्यांनी जांभळ्या रंगाचा फुलांच्या नक्षीचा सलवार ड्रेस, लाल रंगाचा पायजमा आणि पिवळ्या रंगाची चप्पल घातली होती. त्यांच्या उजव्या हातात पंचरंगी धागा असून गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे. सदर वर्णनाची महिला कोणाला आढळल्यास तात्काळ महाड एमआयडीसी पोलीस ठाणे किंवा तक्रारदार रविकांत पवार (मो. 9764617771) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पी. एस. पवार करीत आहेत.







