। पनवेल । वार्ताहर ।
सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल तालुक्यातील वलप गावाच्या परिसरात घडला आहे. संगीता राजेंद्र आगवणे (49 रा.गणेशनगर, वलप) असे मृत महिलेचे नाव आहे.
मंगळवारी (दि. 08) सकाळी संगीता यांचा मुलगा खाजगी शिकवणी घेवून घरी परत येत होता. त्याचवेळी त्याला आर्चित किराणा दुकानाजवळील कच्च्या रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. कोणीतरी अज्ञात इसमाने सदर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व पर्स असा एकूण 1 लाख 95 हजार 8520 रुपये किंमतीच्या वस्तू जबरीने काढून घेण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली आणि अंगावरील सोन्याचे दागिने जबरी चोरी करून तो पसार झाला.
याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून या घटनेची माहिती मिळताच वपोनि अनिल पाटील, पो.नि.जगदीश शेलकर व पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. तसेच, पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.