पोलिसाकडून महिलेचा विनयभंग

गुन्हा दाखल करूनही आरोपी मोकाट

| महाड | प्रतिनिधी |

महाड शहराच्या हद्दीत स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संजय जाधव यांच्याविरोधात महाड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, गुन्हा दाखल करूनही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आरोपीला अभय देणार्‍या पोलिसांबद्दल महाड शहरात नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाड शहररापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दादली गावातील स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी पायी जात असताना संजय जाधव यांनी तिला रस्त्यामध्ये अडवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मला फोन कर, नाही तर तुझा फोन नंबर दे अशी धमकी दिली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून महाड पोलिसांनी संजय जाधव यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला असला तरी, या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांचे अभय असल्याने तो अजूनही मोकाट फिरत असल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे.

याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. कापडेकर करीत आहेत. संजय जाधव यांच्या गैरवर्तनाबद्दल महाड शहरातील महिलांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, जाधव याचा शहरातील महिलांनी निषेध व्यक्त केला आहे.

Exit mobile version