लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

। पनवेल । प्रतिनिधी ।

लग्न जुळविणाऱ्या वेबसाइटवरून एका महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवित तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या महिलेची सुमारे 12 लाखांची आर्थिक फसवणूकही करण्यात आली आहे. अक्षय पाटील (33) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या घटनेतील 32 वर्षीय पीडित महिला कामोठे येथे राहण्यास असून आरोपी अक्षय हा पनवेलमधील करंजाडे परिसरात राहण्यास आहे. हे दोघेही घटस्फोटीत असून या दोघांनी एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर लग्नासाठी नोंदणी केली होती. नोव्हेंबर 2025 मध्ये आरोपी अक्षयने पीडित महिलेशी ओळख वाढवून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्याने पीडित महिलेचा विश्वास संपादन करत, तिला लोणावळ्यातील हॉटेलमध्ये, कामोठे सेक्टर 14 या ठिकाणी नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्याने व्यवसायासाठी आणि वैयक्तिक अडचणींचे कारण सांगून पीडित महिलेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्याने पीडितेला तिच्या नावावर बँकेचे कर्ज काढण्यास भाग पाडले. त्यातून आलेली रक्कम त्याने स्वतःसाठी वापरली. अशा प्रकारे अक्षय याने पीडित महिलेची एकूण 11 लाख 92 हजार 900 रुपयांची फसवणूक केली. ही फसवणूक लक्षात येताच पीडित महिलेने रविवारी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version