दोन मुलींसह महिलेचा बुडून मृत्यू

| यवतमाळ | वृत्तसंस्था |

निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलींसह त्यांच्या काकूचा पैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथे घडली. प्रतीक्षा प्रवीण चौधरी (35), अक्षरा निलेश चौधरी (13) आणि आराध्य निलेश चौधरी (11) अशी मृतकांची नावे आहेत. अवैध रेती उत्खननामुळे पैनगंगा नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने एका चिमुकलीचा तोल जाऊन ती त्यात पडली. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली. दोन्ही चिमुकल्या बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्या प्रयत्नात काकू देखील बुडाल्या. या घटनेची माहिती मिळातच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत तिघीही खोल खड्ड्यात बुडाल्या होत्या.

रेतीमाफियांमुळे नदी उठली जीवावर
पैनगंगा नदीपात्रातून दिवसरात्र रेतीचा उपसा केला जातो. या अवैधपद्धतीने रेती उत्खनन केल्यामुळे मोठमोठे खड्डे नदीपात्रात पडले आहेत. यामुळे नदीपात्रात अक्षरशः विहिरीच्या आकाराचे विवर तयार झाले आहेत. यात पाण्याचा प्रवाह फिरत असल्याने तेथे अंदाज येत नाही. परिणामी या रेतीमाफियांमुळे नदीपात्र आता लोकांच्या जीवावर उठत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
Exit mobile version