बचतगटातून महिलांचे पाऊल पडतंय पुढे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामीण परिसरातील महिला आता बचतगटाच्या माध्यमातून स्वत:चे सक्षमीकरण करत परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकताना दिसतात. रायगड जिल्ह्यात 14 हजार 571 महिला बचतगट कार्यरत असून त्यापैकी 6 हजार 227 गटांना 10 ते 15 हजारांचे फिरत्या निधीच्या स्वरूपामध्ये 9 कोटी 25 लाख 95 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर समुदाय गुंतवणूक निधीअंतर्गत 437 ग्रामसंघ तयार करण्यात आले असून, त्यापैकी 22 ग्रामसंघांना 28 लाखांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय जोखीम निधी, स्टार्टअप निधी, बँकेशी लिंक असलेले कर्ज असा कोट्यवधींचा निधी देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला एकत्रित येऊन व्यवसाय करत असल्यामुळे व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया असल्यामुळे स्त्रियांमध्ये मोठया प्रमाणात उद्योजकता निर्माण झाली आहे. अनेक प्रकारचे उद्योग या चळवळीतून जन्माला आले आहेत. या चळवळीने ग्रामीण भागातील प्रगतशील विशेषत: महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. जिल्ह्यात एकूण 14 हजार 571 बचतगटांनी नोंदणी असून या बचतगटांच्या माध्यमातून विशेषत: महिलांना आत्मविश्‍वास, आत्मनिर्भयता, आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या सक्षमीकरणाचे धोरण स्वीकारले आहे.

जिल्ह्यात 437 ग्रामसंघ
रायगड जिल्ह्यात 14 हजार 571 बचतगट नोंदणीकृत असून, अनेक बचतगट एकत्र येऊन ग्रामसंघ स्थापन करण्यात येत आहे. असे जिल्ह्यात एकूण 437 ग्रामसंघ स्थापन करण्यात आले आहेत. ज्या बचतगटांनी एकत्रित येऊन ग्रामसंघ स्थापन केला नाही. अशा गटांचे ग्रामसंघ स्थापन करण्याची प्रक्रिया हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Exit mobile version