| पेण | प्रतिनिधी |
कुटुंबातील महिला ही खर्या अर्थाने महत्त्वाचा स्तंभ आहे, तो स्तंभ कोलमडल्यास पूर्ण कुटुंब कोलमडून जाण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन जेएसडब्ल्यू कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अॅडमिन, सिक्युरिटी, लिगल कॅप्टन राजेश कुमार रॉय यांनी केले. महिलांचे आरोग्य जपणे गरजेचे असून, भविष्यात त्यांच्या आरोग्याविषयी ज्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी जेएसडब्ल्यू फाऊंडेशन काम करेल आणि महिलांना निरोगी आरोग्य कसे देता येईल याकडे लक्ष देण्यात येईल, असे आश्वासनही रॉय यांनी दिले.
वडखळ येथे जेएसडब्ल्यू फाऊंडेशन सीएसआर डोलवी अंतर्गत पाच लाख लीटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीचे भूमीपूजन गुरुवारी (दि. 14) कॅप्टन राजेश कुमार रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जेएसडब्ल्यू कंपनी वडखळ डोलवी परिसरात भविष्यात कोणकोणत्या सुविधा देणार आहेत त्याबाबत भाष्य करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, या परिसरामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आणून या परिसरात जी घनकचर्याची समस्या आहे, ती समूळ नष्ट करण्याचा मानस कंपनी प्रशासनाचा आहे. मात्र, स्थानिक ग्रामपंचायतीने आम्हाला मदत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्थानिकांची मानसिकताही बदलणे गरजेचे आहे आणि ते बदलविण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. आज वडखळ येथे पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन करताना खूप आनंद झाला आहे. भविष्यातदेखील जेएसडब्ल्यू कंपनी अशा प्रकारच्या नागरिकांच्या हिताच्या कामांना नक्कीच प्रोत्साहन देईल, असे शेवटी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील यांनी केले. तर, आभार प्रदर्शन निलेश म्हात्रे यांनी केले.
वडखळ बोरी फाटा येथे प्रथम विधीवत टाकीचे भुमिपूजन करून कॅप्टन राजेश कुमार रॉय यांच्या हस्ते टिकाव मारून कामाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर वडखळ ग्रामपंचायती मार्फत जेएसडब्ल्यू कंपनीचे आलेले अधिकारी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऍडमिन, सिक्युरिटी, लिगल कॅप्टन राजेश कुमार रॉय ,असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट जनसंपर्क विभाग आत्माराम बेटकेकर, सीएसआर हेड सुधीर तेलंग, कुमार थत्ते, गणेश बोडके, सुशांत वडवल, अदींचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. यावेळी उपसरपंच मत्स्यगंधा म्हात्रे, सदस्य योगेश पाटील, निलेश म्हात्रे, नुतन म्हात्रे, सुनिल जांभळे, मिलींद मोकल, विनोदिनी कोळी, योगिता मोकल, संजय पवार, प्रभाकर म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संदेश गायकवाड, सचिन म्हात्रे, यांच्यासह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.