महिला मारहाण प्रकरण; ठाकरे-फडणवीसांचा कलगीतुरा

| ठाणे | प्रतिनिधी |

ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला केलेल्या मारहाणीचे पडसाद मंगळवारी दिवसभर उमटत राहिले. या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

फडतूस गृहमंत्री- ठाकरे
महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत, अशी गंभीर टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत मारहाण केली. यात रोशनी शिंदे या जखमी झाल्यात. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांनी लाचारी पत्करली. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. फडणवीस गृहमंत्री नव्हे गुंडमंत्री आहेत. गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका त्यांनी केली.

खुर्चीसाठी लाळ घोटता- फडणवीस
नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि फक्त खुर्चीसाठी विरोधकांची लाळ घोटता, मग खरे फडतूस कोण, याचे उत्तर थयथयाट करणार्‍यांनी आधी दिले पाहिजे, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरेंच्या विधानाबद्दल नागपुरात माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन मंत्री जेलमध्ये गेल्यावर त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत आणि त्यांचा लाळघोटेपणा जे करीत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार तरी काय? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलीस खंडणी गोळा करतात, अशा लोकांना बोलण्याचा अधिकार तरी काय? अडीच वर्षे घरात बसून राजकारण करणार्‍यांनी जास्त बोलू नये. आम्ही संयमाने वागतो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे नाही. ज्या दिवशी बोलणे सुरू करु, त्यादिवशी पळताभूई थोडी होईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

…तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल- बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी स्वभाव बदलला आणि विषय काढणं सुरू केलं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहणं मुश्किल होऊन जाईल, इतकी सामुग्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. काय कर्तृत्व आहे तुमचं? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सर्वस्वी फेल झाले आहात.जणाची नाही तर मनाची ठेवा. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पाच वर्षे तुमचे लाड पोसले, असेही बावनकुळे म्हणाले.

Exit mobile version