भारताचा पराभव, पण मालिका खिशात; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी
| बर्मिंगहॅम | वृत्तसंस्था |
बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाला पराभव स्वीकारावा लागला. तरीही, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशी खिशात घातली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी खेळली.
भारतीय संघाच्या धावसंख्येला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने शेवटच्या चेंडूवर 5 गडी गमावून 168 धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यात, इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने टी-20 मध्ये त्यांचा तिसरा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग केला आहे. इंग्लंडकडून सोफिया डंकले आणि डॅनिएल व्याट-हॉज या सलामी जोडीने शानदार कामगिरी केली. सोफिया डंकलीने 46 धावांची खेळी केली. तर, डॅनिएल वायटने 56 धावा केल्या. याशिवाय, कर्णधार टॅमी ब्यूमोंटने 30 धावांचे योगदान दिले. यावेळी 3 बळी घेणाऱ्या चार्लोट डीनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय संघाने आधीच चौथा सामना जिंकून टी-20 मालिका जिंकली होती. परंतु, मालिका विजयाने संपवू शकला नाही. असे असूनही, भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे. भारतीय महिला संघाने 2006 मध्ये डर्बी येथे खेळल्या गेलेल्या एकमेव टी-20 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. तेव्हापासून, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मायदेशात आणि परदेशी भूमीवर कधीही टी-20 मालिका जिंकली नव्हती. परंतु, यावेळी भारतीय संघाने मागील अपयश विसरून प्रथमच टी-20 मालिका जिंकली आहे. या मालिकेत 20 वर्षीय श्री चरणीची मालिकावीर म्हणून निवड झाली. श्री चरणीने पदार्पणाच्या मालिकेत 5 सामन्यांमध्ये 10 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ आता 16 जुलैपासून यजमान इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार आहेत.







