महाडमधील ‘प्रसोल’विरोधात महिला आक्रमक

कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन;प्रदूषणामुळे अनेक गावे बाधित
। महाड । प्रतिनिधी ।
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल कारखान्याच्या विरोधात परिसरातील गावांमधील महिला आक्रमक झाल्या आहेत. होणार्‍या प्रदूषणाबाबत कारखान्याने सुधारणा केली नाही तर कारखाना बंद करावा लागेल, असा सज्जड दम आ. भरत गोगावले यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला. यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते.

महाड औद्योगिक क्षेत्रात पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात प्रसोल केमिकल ही कंपनी आमशेत गावच्या हद्दीमध्ये आहे. कंपनीमध्ये दरवर्षी काही ना काही अपघात होऊन कामगारांमध्ये जीवितहानी झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले असतानाच काही दिवसांपूर्वी कंपनीत काम करणारा एक माथाडी कामगार वायूबाधा झाल्याने दगावल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यातच कंपनीकडून प्रदूषणदेखील होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. या प्रदूषणाबाबत कंपनीच्या शेजारील आमशेत, गावडी, पडवी, काळीजकोंड, या गावांमधील महिलांनी शुक्रवारी प्रसोल कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कंपनीकडून प्रदूषण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. प्रदूषण थांबवले नाही तर कंपनी बंद करा, असा आक्रोश केला.

यावेळी उपस्थित असलेले स्थानिक आ. भरत गोगावले यांनी तोडगा काढण्यासाठी कंपनीला प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असा सज्जड दम दिला. प्रदूषण थांबवले जावे यासाठी कंपनीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. कंपन्या सुरू राहिल्या तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र, हा रोजगार उपलब्ध होत असताना सर्वसामान्य माणूसदेखील जगला पाहिजे याचा विचार कंपन्यांनी केला पाहिजे, असे सांगितले. या औद्योगिक क्षेत्रात बहुतांश कंपन्या या प्रदूषित आहेत. काही ना काही प्रकारचे वास येत असतात. मात्र, प्रसोल कंपनीच्या बाबतीत केली जाणारी तक्रार रास्त आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नदेखील आपण जलजीवनच्या माध्यमातून मार्गी लावू, असे सांगितले.

कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राकेश जाधव यांनीदेखील कंपनीची बाजू मांडत प्रत्येकवेळी कंपनीने आवश्यक बदल करत कंपनीत असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या आसपास राहणार्‍या मानवी जीवाला प्रदूषणाचा कोणताच त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे, असे स्पष्ट केले. कंपनीमध्ये सांडपाणी झिरो डिस्चार्ज आहे यामुळे पाणी बाहेर जाणे शक्य नाही, मात्र कंपनीच्या बाबतीत जो आरोप केला जात आहे, त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आमच्या पथकाकडून सखोल चौकशी केली जात आहे, असेही स्पष्ट केले. सध्या महिलांनी केलेल्या मागणीनुसार कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. कंपनीच्या वतीने वरिष्ठ अधिकारी राकेश जाधव, प्रोजेक्ट हेड धवल शहा, एच.आर. हेड शोभा शेट्टीय्यन, मनोज कक्कड, भरत शेट्टे आदी उपस्थित होते.

Exit mobile version